विधान परिषद निवडणुकीत ठाकरेसेनेची एन्ट्री; दोन उमेदवार जाहीर, अमरावतीत काँग्रेसशी थेट लढत
अमरावती शिक्षक मतदारसंघातून दत्तात्रय लहाने, छत्रपती संभाजीनगर पदवीधरमधून दिलीप घुगे यांना उमेदवारी; भाजपकडून तीन उमेदवार जाहीर

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून विविध राजकीय पक्षांकडून उमेदवार जाहीर केले जात आहेत. भाजपने रविवारी तीन उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दोन उमेदवार जाहीर केले आहेत. ठाकरेसेनेकडून अमरावती शिक्षक मतदारसंघातून दत्तात्रय लहाने, तर छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून दिलीप घुगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने यापूर्वीच अदिती ऋषिकेश पोहरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता अमरावतीच्या जागेवर काँग्रेस आणि ठाकरेसेनेकडून स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरले आहेत. काँग्रेसच्या उमेदवार अदिती पोहरे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे वृत्त आहे. या मतदारसंघातून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे दिलीप कडू यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान, भाजपने पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून सुधाकर विठ्ठलराव कोहळे आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे भाजपने पाचपैकी तीन जागांसाठी आपले उमेदवार स्पष्ट केले आहेत.
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारीसाठी चर्चा सुरू होती. अखेर भाजपने कौस्तुभ गावडे यांचे नाव जाहीर केले आहे. या जागेवर इतर उमेदवारांच्या भूमिकेकडेही आता लक्ष लागले आहे.
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील या पाच जागांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान होणार असून २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ६ ऑक्टोबर आहे.




