Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

संजय शिरसाट यांनी ५ कोटींची मागणी केल्याचा संजय राऊतांचा खळबळजनक आरोप!

अण्णाभाऊ साठे ट्रेनिंग सेंटरच्या प्रस्तावासाठी लाचेची मागणी केल्याचा दावा; सामाजिक न्यायमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी लातूरमधील सामाजिक कार्यकर्त्याकडे अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने प्रस्तावित ट्रेनिंग सेंटरचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पाच कोटी रुपयांची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणाची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देण्यात आल्यानंतरही मंत्र्यांनी लाचेची मागणी कायम ठेवल्याचा दावा राऊत यांनी केला. या आरोपांची गंभीर दखल घेऊन संजय शिरसाट यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

संजय राऊत सध्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असून, बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्याच्या कारभाराबाबत अपेक्षा होत्या. मात्र, प्रशासन आणि मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण दिसत नसल्याची टीका त्यांनी केली. राज्यात भ्रष्टाचार आणि दुष्काळ या दोन्हींची झळ नागरिकांना सहन करावी लागत असल्याचेही राऊत म्हणाले.

२५ कोटींच्या प्रकल्पासाठी पाच कोटींची मागणी केल्याचा दावा

राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर येथील सामाजिक कार्यकर्ते नरसिंग उदगीरकर यांनी त्यांची भेट घेतली होती. मातंग समाजातील मुलांना तसेच दलित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने २५ कोटी रुपयांचे ट्रेनिंग सेंटर उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी सादर केला होता. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही प्रस्तावाला मंजुरी मिळत नसल्याने त्यांना वारंवार मंत्रालयात फेऱ्या माराव्या लागत असल्याचे राऊत यांनी सांगितले.

मंत्र्यांचे ओएसडी सिद्धार्थ भंडारी यांनी मंत्र्यांची भेट घेतल्याशिवाय काम होणार नसल्याचे उदगीरकर यांना सांगितल्याचा दावाही राऊत यांनी केला. त्यानंतर संजय शिरसाट यांनी उदगीरकर यांना भेटीसाठी बोलावले. या भेटीत २५ कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पाच कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी मंत्र्यांनी केल्याचा आरोप राऊत यांनी केला.

हेही वाचा –  ‘२०२९ मध्ये ३ लाख ४६ हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी होणार!’ – ओमराजे निंबाळकर

उदगीरकर यांनी आपण दलित आणि मातंग समाजातील मुलांसाठी काम करत असून, एवढी मोठी रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यावर पैसे न दिल्यास प्रस्ताव मंजूर होणार नसल्याचे सांगण्यात आल्याचा दावा राऊत यांनी केला. त्यामुळे अद्यापही हा प्रस्ताव मंजूर झालेला नसल्याचे त्यांनी नमूद केले.

‘नरसिंग उदगीरकर यांना बोलवा आणि सत्य तपासा’

या प्रकरणाची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देण्यात आली होती. मात्र, विभागाकडून मंत्र्यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी लाचेची मागणी कायम ठेवल्याचा दावा राऊत यांनी केला. “मी सांगतो ते तथ्य तपासा. नरसिंग उदगीरकर यांना बोलवा आणि त्यांची बाजू ऐकून घ्या,” असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित यंत्रणांना केले. या आरोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group