Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘गेल्या १२ वर्षांपासून माझा शपथविधी होतोय; या चर्चांमध्ये मला रस नाही!’ – सुप्रिया सुळे

मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचा मिश्कील टोला; ‘राजकीय चर्चांपेक्षा धोरणात्मक प्रश्नांवर बोला’, माध्यमांना आवाहन

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पक्ष भाजपप्रणित एनडीएमध्ये सहभागी होणार आणि त्याबदल्यात खासदार सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी बुधवारी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना मिश्कील प्रतिक्रिया दिली. “गेल्या १२ वर्षांपासून माझा शपथविधी होतोय. माझ्यावर अन्याय करू नका,” असा टोला त्यांनी लगावला.

सुप्रिया सुळे यांना यापूर्वी केंद्रीय मंत्री होणार असल्याची चर्चा होती आणि आता मुख्यमंत्री होणार असल्याचे बोलले जात आहे, याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी, “२०१४ पासून मी मुख्यमंत्री होतेय. मला या कोणत्याही कथांमध्ये रस नाही,” असे स्पष्ट केले. राजकीय पदांच्या चर्चांपेक्षा संसदेत आपण ज्या धोरणनिर्मितीच्या कामासाठी निवडून गेलो आहोत, त्यावर चर्चा व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

“मला एका गोष्टीचे दुःख आहे की, ज्या पॉलिसी मेकिंगसाठी मी संसदेत निवडून गेले, त्याबद्दल गांभीर्याने कोणी विचारत नाही. सध्या मी चार संयुक्त संसदीय समित्यांवर (JPC) काम करत आहे. देशाचे आर्थिक धोरण ठरवणाऱ्या वित्तीय समितीमध्येही माझा समावेश आहे. राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळते, हे माझे भाग्य आहे. या कामाबद्दल कोणी प्रश्न विचारला तर मला अंतःकरणापासून आनंद होईल,” असे त्या म्हणाल्या.

महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती असून, संसदेत देशपातळीवरील महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा सुरू आहे. या विधेयकांचा नागरिकांच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांऐवजी अशा महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही सुळे यांनी केले.

हेही वाचा –  शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी!

तटकरे म्हणाले, ‘अधिकृत भूमिका आल्याशिवाय भाष्य नाही’

दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विचारले असता, त्यांनी सावध भूमिका घेतली. “जोपर्यंत याबाबत अधिकृतरीत्या कोणी बोलत नाही, तोपर्यंत मी भाष्य करणार नाही. आमचे महायुतीचे सरकार मजबूत आहे. आमच्याकडे २३८ आमदारांचे संख्याबळ आहे. भाजपचे १३२, शिवसेना (शिंदे गटाचे) ६० आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ आमदार आहेत. त्यामुळे आमचे राजकीय चित्र स्पष्ट आहे,” असे तटकरे म्हणाले.

सुप्रिया सुळे यांनी आगामी विधेयकाला पाठिंबा देताना ५० टक्के समान जागांची भूमिका स्वीकारली, तर त्यांचे एनडीएचा घटक म्हणून स्वागत करेन, असेही तटकरे यांनी नमूद केले. लोकसंख्येतील वाढीचा विचार करता मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे सांगत त्यांनी इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात निश्चित झालेल्या जागांच्या तुलनेत लोकसंख्या चार पटीने वाढल्याचा दावा केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group