महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्राकडे पाठपुरावा; पंतप्रधान मोदींसोबत फडणवीसांची महत्त्वपूर्ण चर्चा
पंतप्रधान मोदींसह निर्मला सीतारामन, भूपेंद्र यादव यांची घेतली भेट; महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्राकडून अपेक्षित मदतीवर चर्चा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील प्रशासन आणि विविध विकास प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा केली. केंद्र सरकारकडून राज्याला अपेक्षित असलेल्या मदतीबाबतचे पत्रही त्यांनी पंतप्रधानांना दिले. महामार्ग, रेल्वे, मेट्रो, नदीजोड तसेच केंद्राच्या विविध प्रकल्पांबाबत या भेटीत चर्चा झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही भेट घेतली. जायकवाडी संदर्भातील प्रस्तावाबाबत ही भेट झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पर्यावरण आणि वन विभागाशी संबंधित काही मंजुरींबाबत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याशीही चर्चा केल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
फडणवीस म्हणाले, “राज्यातील प्रशासन आणि विविध प्रकल्पांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. केंद्र सरकारचे काही प्रकल्प सुरू आहेत, त्याचीही माहिती दिली. महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारकडून कोणत्या प्रकारची मदत अपेक्षित आहे, याबाबत चर्चा केली. पंतप्रधानांसोबतची चर्चा उत्तम प्रकारे झाली.”
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत जायकवाडी संदर्भातील प्रस्तावावर चर्चा झाली असून, त्यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यास राज्य सरकार तयार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचा – आरक्षण संपविण्याची भाषा संविधानाचा अपमान; अशांवर कठोर कारवाई करा : रामदास आठवले
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. याबाबत विचारले असता फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला.
“मी दिल्लीत असलो तरी चर्चा होतात आणि मुंबईत असलो तरी चर्चा होतात. अनेक रिकामटेकड्या लोकांना माझ्याबद्दल चर्चा करायला आवडते. त्यामुळे त्यांना आनंद घेऊ द्या. ज्याला जे तारे तोडायचे आहेत, ज्याला जे फुगे उडवायचे आहेत आणि जी काही पतंगबाजी करायची आहे, ती करू द्या,” असे फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्राची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील जनतेने आपल्यावर सोपवली असून, आपण प्रामाणिकपणे राज्याची सेवा करत असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
“अनेक लोकांना वाटते की मी दिल्लीत गेले पाहिजे. त्या सर्वांना मी सांगतो की, मी मुंबईतच आहे. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा प्रामाणिकपणे करत आहे आणि पुढेही करत राहणार आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.





