आरक्षण संपविण्याची भाषा संविधानाचा अपमान; अशांवर कठोर कारवाई करा : रामदास आठवले
एससी-एसटीच्या आरक्षणाला क्रिमिलेअर लागू करण्यास विरोध; मराठ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण देणे शक्य नसल्याचे स्पष्ट

नागपूर : आरक्षण रद्द करण्याची मागणी करणे म्हणजे संविधानाचा अपमान असून, अशा प्रकारची भाषा करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहासारखी कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली. आरक्षण हे संविधानाने दिलेले अधिकार असून, ते संपविण्याऐवजी वंचित घटकांना अधिकाधिक संधी मिळवून देण्याची भूमिका असली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. शैक्षणिक आणि सरकारी नोकऱ्यांमधील एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण हे घटनात्मक असल्याचे सांगत त्यांनी आरक्षणविरोधी मोहिमेवर टीका केली. राजकीय आरक्षणाची मुदत वाढविण्यासाठी संसदेत वेळोवेळी विधेयक आणले जाते. मात्र, शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षण रद्द करण्याची मागणी करणे योग्य नाही, असे ते म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एससी आणि एसटी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठा संघर्ष केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे एससी-एसटी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात २२.५ टक्के आरक्षण मिळाले आहे. ओबीसींनाही आरक्षण मिळावे, अशी भूमिका डॉ. आंबेडकरांची होती. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्यात आले. एससी-एसटी आरक्षणाला क्रिमिलेअरची अट लागू करण्यास आपला विरोध असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – ‘आवारापन 2’ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई; तीन दिवसांत ८२ कोटींचा गल्ला
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे; मात्र मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देता येणार नाही, असे आठवले यांनी सांगितले. राज्यात मराठा समाजासाठी १० टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारच्या ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभही पात्र गरीब मराठा समाजाने घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
झारखंडमध्ये पेपरफुटीविरोधात विद्यार्थी आंदोलन करत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आंदोलन संपविण्यासंदर्भात पत्र लिहिले. यावरून आठवले यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. दिल्लीतील आंदोलनाच्या वेळी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे राहुल गांधी झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा का मागत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राहुल गांधींची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोपही त्यांनी केला.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील सभेनंतर काही व्यक्तींनी सभेचे ठिकाण शुद्ध केल्याचा प्रकार समोर आला. हा प्रकार मल्लिकार्जुन खरगे यांचा अपमान करणारा असून त्याचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन करता येणार नाही. अशा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही रामदास आठवले यांनी केली.





