पिंपळे सौदागरमधील ट्रायोज-झूलेलाल टॉवर रस्त्याच्या विकासकामाला गती
ट्रायोज-झूलेलाल टॉवर रस्त्यावर स्टॉर्म वॉटर लाईनचे काम वेगाने सुरू; वाहतूक कोंडी व पाणी साचण्याची समस्या दूर होणार

पिंपळे सौदागर : भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या निर्देशानंतर पिंपळे सौदागर येथील ट्रायोज-झूलेलाल टॉवर या महत्त्वाच्या रस्त्याच्या विकासकामाला गती मिळाली आहे. या कामाअंतर्गत स्टॉर्म वॉटर (पावसाळी ड्रेनेज) लाईन टाकण्याच्या कामालाही वेग देण्यात आला आहे. परिसरातील वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या दूर करण्यासाठी हे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे.
या संदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत शत्रुघ्न काटे यांनी संबंधित महापालिका प्रशासनाला आवश्यक कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर रस्त्यालगत आवश्यक पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्यात आली आहेत.
ट्रायोज-झूलेलाल टॉवर हा परिसरातील प्रमुख संपर्क मार्ग असल्याने या रस्त्याच्या विकासामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचण्याच्या समस्येवरही कायमस्वरूपी तोडगा काढण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा – श्री म्हाळसाकांत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती कार्यशाळेचे यशस्वी आयोजन
नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका कुंदाताई भिसे आणि नगरसेविका अनिताताई काटे हे या प्रकल्पावर विशेष लक्ष ठेवून असून, कामाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेत आहेत. रस्ता विकासाचे काम दर्जेदार पद्धतीने आणि निश्चित कालावधीत पूर्ण व्हावे, यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.
परिसरातील नागरिकांना सुरक्षित, प्रशस्त आणि दर्जेदार रस्ता उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होण्यासह पावसाळी पाण्याचा निचरा सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.





