श्री म्हाळसाकांत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

आकुर्डी, पुणे : श्री म्हाळसाकांत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सेक्टर क्रमांक २८, प्राधिकरण, आकुर्डी, पुणे – ४११०४४ येथे दिनांक २७ जुलै २०२६ रोजी इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत सायबर सुरक्षा जनजागृती कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
मा. उपप्राचार्य श्री. शशिकांत सात्रस सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. क्विक हील फाउंडेशन यांच्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमांतर्गत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. “सुरक्षित डिजिटल भारत, सजग डिजिटल नागरिक” तसेच “माझा डेटा, माझी जबाबदारी” हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे, सुरक्षित इंटरनेट वापराच्या सवयी विकसित करणे आणि सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ज्ञान देणे, हे या अभियानाचे प्रमुख ध्येय आहे.
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना सायबर फसवणूक, फिशिंग, बनावट संकेतस्थळे व दुवे, ओटीपी फसवणूक, सामाजिक माध्यमांची सुरक्षितता, ऑनलाइन गेमिंगमधील धोके, डिजिटल ठसे, मजबूत संकेतशब्द तयार करण्याच्या पद्धती तसेच वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
हेही वाचा – यश मिळाल्यानंतर संस्कार, विवेक आणि नम्रता जपावी – शास्त्रज्ञ के. व्ही. कोकिळ
विषय विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजावा यासाठी प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, दैनंदिन जीवनातील उदाहरणे आणि संवादात्मक प्रश्नोत्तरांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारून सायबर सुरक्षेबाबत अधिक माहिती जाणून घेतली.
ही कार्यशाळा एमआयटी एसीएससी, आळंदी महाविद्यालयाच्या सायबर वॉरियर टीमने, विभागप्रमुख मा. श्री. अमित तळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली.
सायबर वॉरियर टीम
* यश घुले – सायबर वॉरियर
* भावेश खिलारी – सायबर वॉरियर
क्विक हील फाउंडेशनच्या अध्यक्षा मा. सौ. अनुपमा काटकर मॅडम तसेच सहयोगी संचालक मा. श्री. अजय शिर्के सर यांच्या प्रेरणेतून राबविण्यात येणाऱ्या या अभियानाद्वारे देशभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण होऊन सुरक्षित, सजग आणि जबाबदार डिजिटल समाज घडविण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.





