आदर्श शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती सत्र उत्साहात संपन्न

पिंपरी-चिंचवड : डिजिटल माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता विद्यार्थ्यांना ऑनलाइन जगातील धोके समजावून देऊन त्यांना सुरक्षित आणि जबाबदार डिजिटल नागरिक बनविण्याच्या उद्देशाने आदर्श शिक्षण संस्था येथे इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले.
क्विक हील फाउंडेशन यांच्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या अभियानांतर्गत आयोजित या सत्राचा मुख्य संदेश ‘माझा डेटा, माझी जबाबदारी’ हा होता. विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेच्या मूलभूत बाबी समजावून देणे आणि इंटरनेटचा सुरक्षित व जबाबदार वापर करण्याच्या सवयी विकसित करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
सत्रामध्ये विद्यार्थ्यांना वैयक्तिक माहितीची सुरक्षितता, मजबूत संकेतशब्द, ओटीपीची सुरक्षितता, फिशिंग व बनावट लिंक, समाजमाध्यमांची सुरक्षितता, सायबर बुलिंग, सुरक्षित ऑनलाइन गेमिंग, सुरक्षित इंटरनेट ब्राउझिंग, अनोळखी ॲप्स व फाईल्स डाउनलोड करण्याचे धोके याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
हेही वाचा – श्री म्हाळसाकांत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती कार्यशाळेचे यशस्वी आयोजन
ऑनलाइन वापरताना कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास ती लपवून न ठेवता पालक किंवा शिक्षकांना त्वरित सांगणे किती महत्त्वाचे आहे, हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आले. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्यात आला आणि त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
या उपक्रमासाठी मा. सौ. वंदना लढे मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
क्विक हील फाउंडेशनच्या अध्यक्षा मा. सौ. अनुपमा काटकर मॅडम यांच्या प्रेरणेतून आणि एमआयटी एसीएससी, आळंदीचे प्राध्यापक समन्वयक (फॅकल्टी कोऑर्डिनेटर) मा. श्री. अमित तळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. एमआयटी एसीएससी, आळंदी यांच्या सहकार्याने विविध शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत सायबर सुरक्षेचा संदेश पोहोचविण्याचे कार्य सुरू आहे.
सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांनी सुरक्षित इंटरनेट वापरण्याचा तसेच कोणतीही संशयास्पद ऑनलाइन घटना घडल्यास पालक किंवा शिक्षकांची मदत घेण्याचा निर्धार व्यक्त केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण होऊन सुरक्षित, सजग आणि जबाबदार डिजिटल पिढी घडविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले.





