राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन सेवांच्या शुल्क वाढीस स्थगिती

मुंबई : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून विशेष पर्यटन सेवांचे शुल्क वाढविण्यात आले होते. त्यासाठी संबंधित विभागाकडून मान्यताही मिळाली होती. उद्यानातील विविध पर्यटन सेवांच्या शुल्कासह उद्यानात सकाळच्या वेळी प्रभात फेरीसाठी आकारण्यात येणाऱ्या वार्षिक शुल्कातही वाढ करण्यात आली होती. नवे दर १ मे पासून लागू होणार होते. मात्र, नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर उद्यान प्रशासनाकडून पर्यटन शुल्क वाढीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून लवकरच नवे दर निश्चित केले जाणार आहेत.
बोरीवली येथे असणारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईकरांसह अनेक पर्यटकांचे आवडते उद्यान असून तेथे मोठ्या संख्येने नागरिक भेट देत असतात. उद्यान प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, उद्यान व्यवस्थापनाची तांत्रिक सक्षमता वाढविण्यासाठी, उद्यानातील पायाभूत सुविधा तसेच उद्यान देखभालीच्या अनुषंगाने नवे दर निश्चित करण्यात आले होते. त्यात प्रवेश शुल्क, उद्यानातील विविध सफारींचे शुल्क, प्रभातफेरीसाठीचे वार्षिक शुल्क, वाहनतळ शुल्क तसेच इतर पर्यटन सेवा आणि मिनी ट्रेनच्या तिकीटासाठीही नवे दर १ मे पासून लागू होणार होते. मात्र, प्रभात फेरीच्या वाढविण्यात आलेल्या शुल्काबद्दल स्थानिक नागरिकांनी आणि सकाळी उद्यान परिसरात प्रभात फेरीसाठी येणाऱ्या नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
हेही वाचा – ‘पीडितेला न्याय मिळवून देण्यास सरकार कटिबद्ध’; राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर
उद्यान परिसरात सकाळच्या वेळी प्रभात फेरीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. तसेच अनेक खेळाडूही येथे धावण्यासाठी येत असतात. यात प्रभात फेरीचे ज्येष्ठ नागरिकांसाठी वार्षिक शुल्क ३४८ रुपयांवरून ५ हजार इतके करण्यात आले होते. तर इतर नागरिकांसाठी हेच दर ७४८ रुपयांवरून १० हजार इतके करण्यात आले होते.
याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस नयन कदम यांनीही संबंधित विभागांना पत्र लिहीत शुल्क वाढीस स्थगिती देण्याची विनंती केली होती. दरम्यान, उद्यान प्रशासनाकडून प्रशासकीय आणि तांत्रिक कारणांमुळे शुल्क दरवाढीस स्थगिती देण्यात आहे. पर्यटन सेवांचे सुधारित दर लवकरच निश्चित केले जातील, असे प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.





