पाच राज्यांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स ७०० अंकांनी उसळला

Share Market | पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे कल आणि पश्चिम बंगालसह तामिळनाडूमध्ये झालेल्या विक्रमी मतदानाचे पडसाद आज भारतीय शेअर बाजारात उमटलेले पाहायला मिळाले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीने मोठी झेप घेतली आहे.
सकाळी ९:२० वाजताच्या सुमारास सेन्सेक्स ७०० अंशांच्या वाढीसह ७७,६२६ च्या पातळीवर व्यवहार करत होता, तर निफ्टी २१९ अंशांनी उसळून २४,२१७ वर पोहोचला होता. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये झालेल्या विक्रमी मतदानानंतर गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
हेही वाचा
अभिनेते विजय भाजपासोबत जाणार? भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांची ऑफर
सोमवारी ऑटो क्षेत्रात जोरदार खरेदी झाली. ज्यामुळे ऑटो निर्देशांक जवळपास १.७% नी वाढला. हीरो मोटोकॉर्प आणि मारुती सुझुकीसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये अनुक्रमे सुमारे २% आणि ४% नी मोठी वाढ दिसून आली. या कंपन्यांच्या दमदार मासिक विक्रीच्या आकडेवारीने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढवला, ज्यामुळे या क्षेत्रात मोठी तेजी आली. तर हिंदुस्तान युनिलिव्हरचा शेअर ३.७०% च्या वाढीसह मजबूत झाला. अदानी पोर्ट्समध्ये ३% हून अधिक वाढ नोंदवली गेली. तर एल अँड टी आणि एम अँड एम या कंपन्यांच्या शेअर्समध्ये २ ते २.५% दरम्यान वाढ पाहायला मिळाली.
तेजीच्या वातावरणातही काही शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. यात कोटक बँकेत सर्वाधिक ३.०७% ची घसरण झाली. तर दिग्गज आयटी कंपनी टीसीएस आणि टायटनचे शेअर सुमारे ०.०६% ते ०.२५% ने कमकुत झाले.





