संजय राऊतांची अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले, कुणीतरी ऐरागैरा..

मुंबई : अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षनाव व पक्षचिन्ह कुणाचं? हा वाद निवडणूक आयोगासमोर आहे. यावर आज सुनावणी होणार आहे. दरम्यान, यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
संजय राऊत म्हणाले, आमच्या प्रकरणातही निवडणूक आयोगाला निकाल फिरवावा लागेल. सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट सांगितलंय की आमदार-खासदारांची फूट म्हणजे पक्षातली फूट नाही. हाच निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसला व आम्हालाही लागू होईल. निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्था राजकीय दबावाखाली काम करतात. राज्यकर्त्यांना हवे तसे निर्णय हवे तेव्हा देतात. या देशाच्या राजकारणाला लागलेली ही कीड आहे. ती केव्हातरी नष्ट करावीच लागेल.
हेही वाचा – Asian Games 2023 : बांगलादेशचा पराभव करत भारतीय संघाचा फायनलमध्ये प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी आहे. शरद पवार दिल्लीत आले आहेत. ते आजच्या सुनावणीला उपस्थित राहतील असं दिसतंय. निवडणूक आयोगाच्या तीन सदस्यांसमोर सुनावणी होते. ज्या पक्षाच्या अध्यक्षावरच समोरच्या व्यक्तीने खटला दाखल केला आहे, त्या पक्षाचे अध्यक्ष समोर बसलेले असताना निवडणूक आयोगाची भूमिका काय असेल? शरद पवारांनी पक्ष स्थापन केलाय. त्यांनी लोकांना पदं दिली, निवडून आणलं. कुणीतरी ऐरागैरा समोर उभा राहतो आणि सांगतो हा त्यांचा पक्ष नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाची आज खरी कसोटी आहे, असंही संजय राऊत म्हणाले.





