सुधा भारव्दाज यांची अखेर भायखळा जेलमधून सुटका
नवी दिल्ली – कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण व माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या वकील सुधा भारव्दाज यांना मुंबई उच्च न्यायालयाने 1 डिसेंबर रोजी जामीन मंजूर केला होता. मुंंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध एनआयएने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
एनआयएची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे सुधा भारव्दाज यांचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. सुधा भारव्दाज यांची 50 हजार रुपयाच्या कॅश सेक्युरिटी आणि अन्य अटीसह जामिनावर आज गुरुवारी भायखळा जेलमधून सुटका करण्यात आली आहे.
भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी 2008 मध्ये सुधा भारद्वाज यांच्यासह आणखी 8 जणांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. दरम्यान बाकी आरोपींचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील सुधा भारद्वाज या पहिल्या आरोपी आहेत, सुधा भारद्वाज यांचा जन्म अमेरिकेत झाला. पुढे त्या 11 वर्षांच्या असताना भारतात आल्या. त्यांनी आयआयटीमधून गणिताची पदवी घेतली. त्यांना परदेशात परतून पुढचे शिक्षण घेण्याची संधी होती. पण कॉलेजच्या काळात त्या दुर्गम भागांतील अनेक सुंदर ठिकाणी फिरल्या होत्या. याच दरम्यान 1986 साली त्यांची भेट छत्तीसगडमधल्या जनमुक्ती मोर्चाचे नेते शंकर गुहा नियोगी यांच्याशी झाली. तिथेच कंत्राटी कामगारांच्या संघर्षात त्या सामिल झाल्या आणि तेव्हापासून आदिवासी लोकांसाठी काम करायचे ठरवले.





