कोल्हापूरच्या सेवा रुग्णालयात अत्याधुनिक MRI, CT Scan सुविधांचे लोकार्पण; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा पुढाकार
कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात एमआरआय, सीटी स्कॅन, आयपीएचएल लॅब आणि यलो फीवर लसीकरण केंद्र सुरू; पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांना होणार लाभ

कोल्हापूर : राज्यातील प्रत्येक नागरिकाला शासकीय रुग्णालयांमध्ये दर्जेदार आरोग्य सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देण्यास शासन प्रयत्नशील आहे. तसेच शासकीय आरोग्य सेवांवरील नागरिकांचा विश्वास वाढवण्यावर भर दिला जात आहे. राज्यातील नागरिकांना मोफत आणि माफक दरात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात अत्याधुनिक एमआरआय, सीटी स्कॅन, आयपीएचएल लॅब आणि यलो फीवर लसीकरण केंद्राचे लोकार्पण सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार शाहू महाराज छत्रपती, महापौर रुपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, आरोग्य सभापती सारिका नांदेकर, महिला व बाल कल्याण सभापती कौसर बागवान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात, आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने, सेवा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप वाडकर, माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. सी. एल. कदम, कृष्णा डायग्नोस्टिकचे कार्यकारी अध्यक्ष आदर्श कर्नावत यांच्यासह नगरसेवक, वैद्यकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.
कोल्हापूर मेडिकल हब म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, उपलब्ध निधीचा योग्य वापर करून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि मोफत आरोग्य सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. राज्यातील आरोग्य सेवांचा आढावा घेण्यासाठी आरोग्य संवाद यात्रा सुरू करण्यात येत आहे. आरोग्य सेवांमधील त्रुटींबाबत नागरिकांना ऑनलाइन तक्रार करता यावी, यासाठी विशेष ॲप सुरू करण्यात आले आहे. लोकसहभागातून आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभाग कार्यरत आहे.
कोल्हापूरला मेडिकल हब म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सेवा रुग्णालयात एमआरआय, सीटी स्कॅन आणि अत्याधुनिक लॅबसारख्या सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. यासोबतच कर्करोग निदान आणि उपचार सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
येत्या काही महिन्यांत ब्रेन स्ट्रोक सेंटर, कॅन्सर सर्जरीसाठी ऑन्कोलॉजी विभाग आणि कॅथलॅब सुरू करण्याचे नियोजन आहे. मोफत आणि माफक दरात आरोग्य सुविधा देण्यासाठी सीपीआर रुग्णालयाबरोबरच सेवा रुग्णालयही पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांसाठी आशेचा किरण ठरेल. तसेच लाईन बाजार, बावडा आणि कदमवाडी परिसरातील नागरिकांना या रुग्णालयात उपचारासाठी प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास आबिटकर यांनी व्यक्त केला.
रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून रुग्णालयातील सुविधांवर नियमित देखरेख ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. कोल्हापुरात यलो फीवर लसीकरणाची सुविधा सुरू झाल्यामुळे आसपासच्या पाच ते सहा जिल्ह्यांतील नागरिकांना लाभ होणार आहे. मित्रा संस्थेच्या सहकार्याने शेंडा पार्क येथे ५०० बेडचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे नियोजन आहे. तसेच २०० बेडचे कॅशलेस रुग्णालय सुरू करण्याचाही प्रयत्न आहे. इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाची क्षमता १०० वरून २०० बेडपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – बुलढाण्यात खरीप पिकांसाठी प्रकल्पांमधील शिल्लक पाणी मिळणार; तूर, कपाशी, हळदीला एक वेळ सिंचन
सेवा रुग्णालयाच्या सुविधांचा नागरिकांना लाभ होणार
खासदार शाहू महाराज छत्रपती म्हणाले की, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून सेवा रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रसामग्री बसवण्यात आली आहे. या सुविधांचा लाभ कसबा बावडा, कदमवाडी परिसरासह जिल्ह्यातील आणि आजूबाजूच्या भागांतील नागरिकांना होईल. भविष्यातही रुग्णालयाला आणखी दर्जेदार सुविधा मिळतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांना चांगल्या सेवा द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले की, गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय चाचण्या आणि उपचारांसाठी हजारो ते लाखो रुपयांचा खर्च करावा लागत होता. सेवा रुग्णालयात उपलब्ध झालेल्या अत्याधुनिक सुविधांचा लाभ कसबा बावडा आणि जिल्ह्यातील नागरिकांना होईल. मित्रा संस्थेच्या माध्यमातूनही विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
शासकीय रुग्णालयांमध्ये दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पालकमंत्री प्रकाश आबिटकर करत असल्याचे सांगून, यापुढेही अशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा महापौर रुपाराणी निकम यांनी व्यक्त केली.
१८९७ मध्ये झाली होती रुग्णालयाच्या इमारतीची पायाभरणी
सेवा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप वाडकर यांनी प्रास्ताविक केले. सेवा रुग्णालयाला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून पूर्वी या रुग्णालयाला ‘द व्हिक्टोरिया डायमंड जुबली हॉस्पिटल’ या नावाने संबोधले जात होते. या इमारतीची पायाभरणी १८ जून १८९७ रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत झाली होती, अशी माहिती त्यांनी दिली.
सध्या रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, शल्यचिकित्सक, रेडिओलॉजिस्ट, दंत शल्यचिकित्सक, नेफ्रोलॉजिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ आणि आयुष वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत.
रुग्णालयात यलो फीवर लसीकरण केंद्र, क्रिटिकल केअर युनिट, कॅथलॅब तसेच ५० बेडच्या रुग्णालयाचे २०० बेडच्या रुग्णालयात श्रेणीवर्धन अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयाच्या विस्तारामुळे गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयांच्या दर्जाचे उपचार, महागड्या चाचण्या आणि वैद्यकीय सुविधा विनामूल्य मिळणे सुलभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ हा मंत्र डोळ्यासमोर ठेवून गरजू रुग्णांपर्यंत विविध वैद्यकीय सुविधांचा लाभ पोहोचवण्यासाठी रुग्णालय कटिबद्ध राहील, असेही डॉ. वाडकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात यांनी आभार मानले.




