दिवाळीपूर्वी महागाईचा भडका! व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आणि विमान इंधन महागले

Commercial LPG Cylinder Price Hike | ऐन सणासुदीच्या आणि दिवाळीच्या काळात सर्वसामान्यांसह व्यावसायिक वर्गाला महागाईचा झटका बसला आहे. मुंबईत सीएनजीच्या दरात प्रति किलो १ रुपयाने वाढ झाल्यानंतर आता १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या (Commercial LPG) दरात १० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या नव्या वाढीमुळे व्यावसायिक सिलिंडरचा दर आता २,८२० रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे, विमान इंधनाच्या (ATF) दरातही प्रति लिटर १.३७ रुपयांची वाढ झाली असून, सलग चौथ्या महिन्यात ही दरवाढ नोंदवली गेली आहे. हे सुधारित दर १ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आले आहेत.
व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्यामुळे हॉटेल, ढाबे आणि कॅटरिंग व्यावसायिकांचा स्वयंपाकाच्या इंधनावरील खर्च वाढणार आहे, ज्यामुळे आगामी काळात ग्राहकांच्या हॉटेल बिलात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारातील घडामोडी आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे यंदाच्या वर्षात इंधन दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले आहेत.
हेही वाचा
घरगुती सिलिंडर, पेट्रोल-डिझेल मात्र स्थिर
व्यावसायिक सिलिंडर महागला असला तरी सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नसून तो ९४२ रुपयांवर स्थिर ठेवण्यात आला आहे. तसेच, पेट्रोल आणि डिझेलचे दरही जैसे थे आहेत; मे महिन्यात या दरांमध्ये शेवटची वाढ करण्यात आली होती.
विमान प्रवासाचा खर्च वाढण्याची भीती
सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरानुसार, विमान इंधनाचे (ATF) दर आता प्रति लिटर १३७.१२ रुपयांवरून १३८.५० रुपयांवर पोहोचले आहेत. ऑगस्टपासून सुरू झालेली ही सलग चौथी दरवाढ आहे. एअरलाइन्स कंपन्यांच्या एकूण ऑपरेटिंग खर्चात इंधनाचा वाटा सुमारे ४० टक्क्यांपर्यंत असतो, त्यामुळे इंधन दरवाढीचा थेट बोजा सणासुदीच्या काळात विमान प्रवाशांच्या तिकिटांवर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.




