इशान किशनचा ऐतिहासिक पराक्रम! सूर्यकुमार यादवचा ४ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम मोडीत

Ishan Kishan Record | भारत आणि न्यूझीलंड यांच्यात हॅमिलटन येथे सुरू असलेल्या पाचव्या टी-२० सामन्यात भारताचा आक्रमक यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशन याने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात अवघ्या २८ चेंडूंत अर्धशतक झळकावत त्याने ६१ धावांची वादळी खेळी साकारली. या खेळीच्या जोरावर इशान किशनने एकाच कॅलेंडर वर्षात टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा भारताचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडीत काढला आहे. आता इशान किशन या विक्रमी यादीत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.
इशान किशनने २०२६ या वर्षात तुफानी फॉर्मात फलंदाजी करत आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये तब्बल १,२२० धावा कुटल्या आहेत. यापूर्वी एका कॅलेंडर वर्षात भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सूर्यकुमार यादवच्या नावावर होता, ज्याने २०२२ मध्ये १,१६४ धावा केल्या होत्या. याशिवाय भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्माही २०२६ मध्ये १,१५३ धावांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
हेही वाचा
इराण-अमेरिका संघर्ष शिगेला! इराणच्या इशाऱ्यानंतर ट्रम्प यांची नव्या हल्ल्यांची धमकी
टी-२० आंतरराष्ट्रीय कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
- इशान किशन: १,२२० धावा (२०२६)*
- सूर्यकुमार यादव: १,१६४ धावा (२०२२)
- अभिषेक शर्मा: १,१५३ धावा (२०२६)
श्रेयस-इशानची ९३ धावांची संकटमोचक भागीदारी
हॅमिलटनच्या मैदानात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. भारतीय संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली; सलामीवीर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन हे दोघे अवघ्या १९ धावांवर बाद होऊन माघारी परतले. या संकटाच्या काळात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या इशान किशनने कर्णधार श्रेयस अय्यरच्या साथीने भारतीय डावाची सूत्रे हाती घेतली.
दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अवघ्या काही षटकांत ९३ धावांची आक्रमक भागीदारी रचून भारताला १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. श्रेयस अय्यरने संयमी अर्धशतक (५० धावा) झळकावून बाजू लावून धरली, तर इशानने ६१ धावांची धुवांधार खेळी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला.




