बुलढाण्यात खरीप पिकांसाठी प्रकल्पांमधील शिल्लक पाणी मिळणार; तूर, कपाशी, हळदीला एक वेळ सिंचन
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा पुढाकार; पिण्याच्या पाण्याचा साठा सुरक्षित ठेवून शेती आणि पशुधनाच्या चाऱ्यासाठी टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्याचे प्रशासनाचे नियोजन

बुलढाणा : जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचे सूक्ष्म नियोजन करून भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईसाठी आवश्यक साठा राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिल्लक राहणारे पाणी खरीप हंगामातील तूर, कपाशी आणि हळद या पिकांना एक वेळ सिंचनासाठी देण्यास जिल्हा प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. तसेच पशुधनाच्या चाऱ्याची गरज लक्षात घेऊन प्रकल्पांमधील पाणी टप्प्याटप्प्याने सोडण्यात येणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी यासाठी पुढाकार घेत प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये समन्वय साधला आहे.
यंदा अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतांमधील पिके पाण्याअभावी उभी वाळली आहेत, तर काही ठिकाणी उत्पादनातून लागवडीचा खर्चही भरून निघण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत तूर, कपाशी आणि हळद या पिकांना एक वेळ पाणी मिळाल्यास ती काही प्रमाणात तग धरून उत्पादन देऊ शकतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. यासंदर्भात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेऊन सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत जाधव यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमधील सद्यस्थितीतील पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याची भविष्यातील गरज, बाष्पीभवनामुळे होणारी पाण्याची घट आणि संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रकल्पांमधील पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक साठा, बाष्पीभवनामुळे होणारी पाण्याची घट आणि त्याव्यतिरिक्त १० टक्के अतिरिक्त पाणीसाठा राखीव ठेवून उर्वरित पाण्याचा शेतीसाठी वापर करता येईल का, याची चाचपणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार प्रशासनाने सर्वेक्षण करून पाण्याचे सूक्ष्म नियोजन केले.
हेही वाचा – एसबीपीआयएम येथे कोरिया व्यवसाय आणि संस्कृती कार्यशाळा संपन्न
या नियोजनानंतर पिण्याच्या पाण्यासह भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईसाठी आवश्यक साठा सुरक्षित ठेवून शिल्लक राहणाऱ्या पाण्यातून खरीप पिकांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे शक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार तूर, कपाशी, हळद तसेच पशुधनाच्या चाऱ्यासाठी प्रकल्पांमधील पाणी टप्प्याटप्प्याने सोडण्यास प्रशासनाने सकारात्मकता दर्शवली आहे.
उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन
प्रकल्पांमधून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा शेतकऱ्यांनी काटकसरीने आणि नियोजनपूर्वक वापर करावा. हे पाणी केवळ सध्याच्या खरीप पिकांच्या सिंचनासाठी आणि चाऱ्याची गरज भागविण्यासाठीच वापरावे. रब्बी हंगामातील पिकांसाठी या पाण्याचा वापर करू नये, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे.
अपुऱ्या पावसामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी प्रशासनाच्या माध्यमातून उभे राहणे आणि उपलब्ध जलसाठ्याचा योग्य विनियोग करून खरीप पिकांना दिलासा देणे, हा या नियोजनामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.




