TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

आदेश बांदेकरांनी १२ ते १५ दिवसांत मिळवून दिले कलाकारांचे थकीत मानधन; आशुतोष कुलकर्णीने सांगितला खास किस्सा!

गुजराती निर्मात्याकडून पाच महिने मानधन थकल्याने कलाकारांनी घेतली होती ‘भावोजीं’ची मदत; मध्यस्थी करत आदेश बांदेकरांनी काढला तोडगा

मुंबई : महाराष्ट्राचे लाडके ‘भावोजी’ अर्थात आदेश बांदेकर त्यांच्या मदतीच्या स्वभावासाठी ओळखले जातात. अनेक कलाकारांनी त्यांच्या सहकार्याचे अनुभव यापूर्वीही सांगितले आहेत. आता मराठी अभिनेता आशुतोष कुलकर्णी यानेही आदेश बांदेकरांनी केलेल्या मदतीचा एक खास किस्सा सांगितला आहे. एका मराठी मालिकेतील कलाकारांचे मानधन गुजराती निर्मात्याकडून तब्बल पाच महिने थकले होते. अशा वेळी आदेश बांदेकरांनी मध्यस्थी केली आणि अवघ्या १२ ते १५ दिवसांत सर्व कलाकारांना त्यांचे थकीत मानधन मिळाल्याचे आशुतोषने सांगितले.

पाच महिने मानधन रखडले

‘असंभव’ या गाजलेल्या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या आशुतोष कुलकर्णीने ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत हा अनुभव सांगितला. एका मराठी मालिकेचे फायनान्सर गुजराती होते. सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित सुरू होते; मात्र टीममधील गैरसमज आणि संवादातील अडचणींमुळे परिस्थिती बिघडली. त्यानंतर मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि निर्मात्यांनी खर्चाबाबत हात आखडता घेतला.

आशुतोषच्या म्हणण्यानुसार, मालिकेतील कलाकारांना साधारणपणे तीन महिन्यांच्या अंतराने मानधन मिळत होते. शूटिंग संपल्यानंतरही अपेक्षित मानधन मिळाले नाही. कलाकारांनी निर्मात्याच्या कार्यालयात जाऊन पाठपुरावा केला; मात्र सततच्या दिरंगाईमुळे पाच महिने उलटून गेले. अखेर अनेक कलाकारांचा संयम सुटला आणि पैसे मिळण्याची आशाही कमी होऊ लागली.

हेही वाचा –  ‘अर्थखाते आम्हाला परत मिळायला हवे, ते आमचे हक्काचे खाते’; छगन भुजबळांचे विधान

कलाकारांनी मागितली आदेश बांदेकरांकडे मदत

या परिस्थितीत सर्व कलाकारांनी एकत्र येऊन आदेश बांदेकर यांच्याकडे मदत मागण्याचा निर्णय घेतला. आदेश बांदेकर यांचा प्रभाव आणि ते काहीतरी मार्ग काढतील, असा विश्वास असल्याचे आशुतोषने सांगितले.

“आम्ही सगळे मिळून आदेश बांदेकर यांच्याकडे गेलो. ते प्रचंड प्रभावशाली आहेत, हे मला पहिल्यापासून माहिती होतं. आम्हाला कल्पना होती की आदेशदादा काही ना काही मार्ग काढतील,” अशा शब्दांत आशुतोषने त्या भेटीची आठवण सांगितली.

आदेश बांदेकरांची मध्यस्थी; १२ ते १५ दिवसांत पैसे मिळाले

आशुतोषच्या सांगण्यानुसार, आदेश बांदेकरांनी कलाकारांची अडचण तत्काळ समजून घेतली आणि त्यांना काळजी करू नका, असा विश्वास दिला. त्यांनी संबंधित निर्मात्याला फोन करून भेटीसाठी बोलावले. त्यानंतर सर्वांशी चर्चा करून कलाकारांचे मानधन वेळेत देण्याचे महत्त्व समजावून सांगितले.

आदेश बांदेकरांनी निर्मात्याला योग्य सन्मान देत चर्चा केली. या भेटीदरम्यान चहापान, सिद्धिविनायक मंदिरात दर्शन आणि सर्व कलाकारांसोबत बैठकही झाली. मराठी कलाकारांचे मानधन आधीच तुलनेने कमी असते, त्यामुळे त्यांचे पैसे रोखून धरणे योग्य नाही, अशी भूमिका त्यांनी मांडल्याचे आशुतोषने सांगितले.

“आदेशदादाने शब्द दिल्याप्रमाणे अक्षरशः पुढच्या १२ ते १५ दिवसांत सगळ्यांचे पेमेंट आले,” असे आशुतोषने सांगितले. निर्मात्यांकडून थकीत मानधनापैकी काही रक्कम कमी करून घेण्याचा पर्यायही मांडला जात होता; मात्र कलाकारांसाठी ते मान्य करणे कठीण असल्याचे त्याने स्पष्ट केले.

कलाकारांच्या मदतीसाठी पुढाकार

या प्रसंगातून आदेश बांदेकर यांनी कलाकारांची समस्या समजून घेत मध्यस्थी केल्याचा अनुभव आशुतोष कुलकर्णीने मांडला. अनेक महिने रखडलेल्या मानधनाचा प्रश्न मार्गी लागल्याने कलाकारांना मोठा दिलासा मिळाला. या किस्स्यामुळे मनोरंजनविश्वात आदेश बांदेकर यांच्या मदतीच्या भूमिकेची पुन्हा चर्चा होत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button