‘एकनाथ शिंदेंचा गळा केसाने कापता येणार नाही’; प्रतापराव जाधवांचा विरोधकांना इशारा
विधान परिषद निवडणुकीच्या एक दिवस आधी दीड वर्षांपूर्वीची ऑडिओ क्लिप समोर आणल्याच्या हेतूची चौकशी करण्याची मागणी; ‘मराठा आरक्षण शिंदेंनीच दिले’

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी समोर आणलेल्या कथित ऑडिओ क्लिपवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते प्रतापराव जाधव यांनी केली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या एक दिवस आधी दीड वर्षांपूर्वीची क्लिप बाहेर आणण्यामागे नेमका काय हेतू होता, याची चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठराखण करत त्यांच्या नेतृत्वावर टीका करणाऱ्यांनाही प्रत्युत्तर दिले.
‘क्लिप बाहेर आणण्यामागचा हेतू तपासा’
मनोज जरांगे-पाटील यांनी केलेले आरोप गंभीर असून, त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे, असे प्रतापराव जाधव यांनी स्पष्ट केले. कथित ऑडिओ क्लिपमध्ये भाजपच्या नेत्यांची नावे येत असतील, तर भाजपनेच सर्वप्रथम या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.
“आमचा आवाज कुणीही दाबू शकत नाही. जे सत्य आहे, ते जनतेसमोर आले पाहिजे,” अशी भूमिका जाधव यांनी मांडली. मात्र, ही क्लिप विधान परिषद निवडणुकीच्या एक दिवस आधीच का समोर आली, याबाबतही प्रश्न उपस्थित करत त्यांनी त्यामागील हेतू तपासण्याची मागणी केली.
हेही वाचा – तुकाराम मुंढेंप्रमाणे बिहारमध्येही कारवाईचा धडाका; IAS कुमार रवी यांची भेसळखोरांविरोधात मोहीम
‘एकनाथ शिंदेंनी हिंमत दाखवली म्हणून सत्ता मिळाली’
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे समर्थन करताना प्रतापराव जाधव म्हणाले की, शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच राज्यात सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. “आम्ही ५० लोकांनी भाजपला मदत केली म्हणून भाजप सत्तेत आली. एकनाथ शिंदेंनी ती हिंमत केली नसती, तर भाजपला सत्ता दिसली नसती,” असे विधान त्यांनी केले.
बिहारमध्ये कमी आमदार असूनही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करण्यात आल्याचा दाखला देत जाधव यांनी भाजपच्या नेतृत्वाच्या निर्णयांवर आक्षेप घेणाऱ्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) निर्णयांवरही प्रश्न उपस्थित करावेत, असे म्हटले.
यावेळी त्यांनी, “एकनाथ शिंदे यांचा गळा इतका नाजूक नाही की तो कुणी केसाने कापेल. जे काही चालले आहे, ते चांगले नाही,” असे सांगत शिंदे यांच्या नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर नाराजी व्यक्त केली.
‘मराठा समाजाला १० टक्के आरक्षण शिंदेंनी दिले’
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही प्रतापराव जाधव यांनी एकनाथ शिंदे यांचे योगदान अधोरेखित केले. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शिंदे यांच्यासारख्या नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असेल, तर शिवसैनिकांमध्ये नाराजी निर्माण होणे स्वाभाविक असल्याचे ते म्हणाले.
शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनाही बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप जाधव यांनी केला. तसेच, विदर्भात मराठा आणि ओबीसी समाजातील लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता, आरक्षणाच्या मुद्द्यावर स्वतःच्या समाजातील मुलांचे नुकसान होण्याची शक्यता असतानाही सामाजिक बांधिलकीतून जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले.
कथित ऑडिओ क्लिप, मराठा आरक्षण आणि सत्ताधारी पक्षांतील नेत्यांच्या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या क्लिपमधील दाव्यांची सत्यता आणि ती समोर आणण्यामागील हेतू यांची चौकशी करण्याची मागणी जाधव यांनी केली आहे. या प्रकरणात संबंधित पक्षांकडून पुढे काय भूमिका घेतली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




