इंद्रायणीनगरमध्ये आरोग्य सुविधांना मिळणार बळ!
नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिराचे काम सुरू; उर्वरित जागेवर स्वतंत्र मनपा दवाखाना उभारण्यासाठी डॉ. सुहास कांबळे यांचा पाठपुरावा

इंद्रायणीनगर | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक ८ मधील सेक्टर क्रमांक २, इंद्रायणीनगर येथे नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. नियोजित महानगरपालिका दवाखान्यासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्र उभारण्याचे काम सुरू झाले आहे. या कामाची तसेच प्रस्तावित मनपा दवाखान्याच्या जागेची नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. परिसरातील नागरिकांना लवकरात लवकर आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. कांबळे यांनी पुढाकार घेतला आहे.
इंद्रायणीनगर परिसरातील वाढती लोकसंख्या आणि नागरिकांची आरोग्यविषयक गरज लक्षात घेता, स्थानिक पातळीवरच वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने महानगरपालिकेच्या नियोजित दवाखान्यासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर आरोग्य मंदिर केंद्राचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाची पाहणी करताना डॉ. कांबळे यांनी कामाच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सहकारी मित्र डॉ. पोटे तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.
२२ गुंठे आरक्षित जागेवर स्वतंत्र दवाखान्याची मागणी
इंद्रायणीनगर येथील नियोजित महानगरपालिका दवाखान्यासाठी एकूण २२ गुंठे जागा आरक्षित आहे. यापैकी दोन गुंठे जागेवर नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्र उभारण्यात येत आहे. मात्र, परिसरातील नागरिकांना अधिक व्यापक आणि नियमित वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उर्वरित जागेवर स्वतंत्र महानगरपालिका दवाखान्याची इमारत उभारणे आवश्यक आहे.

हेही वाचा
राजमाता जिजाऊ कॉलेजचे तलवारबाजी स्पर्धेत यश
ही बाब लक्षात घेऊन नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांनी उर्वरित जागेवर नवीन मनपा दवाखान्याची इमारत लवकरात लवकर बांधण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले असून, दवाखान्याच्या उभारणीसाठी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे.
स्थानिक नागरिकांना मिळणार दिलासा
नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्र सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना प्राथमिक आरोग्यविषयक सेवा मिळण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर उर्वरित जागेवर स्वतंत्र मनपा दवाखान्याची इमारत उभारल्यास नागरिकांना अधिक व्यापक आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होऊ शकतील. त्यामुळे नागरिकांना उपचारांसाठी दूरच्या रुग्णालयांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होण्यास मदत होईल.
आरोग्य मंदिर केंद्राचे काम आणि प्रस्तावित दवाखान्याच्या इमारतीची उभारणी या दोन्ही बाबींना गती मिळावी, यासाठी डॉ. सुहास कांबळे यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका घेतली आहे. आता महानगरपालिका प्रशासन या मागणीवर काय कार्यवाही करते आणि स्वतंत्र दवाखान्याच्या उभारणीला कधी सुरुवात होते, याकडे इंद्रायणीनगरमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
इंद्रायणीनगर आणि परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या जवळच उपलब्ध व्हाव्यात, हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. महानगरपालिका दवाखान्यासाठी २२ गुंठे जागा आरक्षित असून, त्यापैकी दोन गुंठे जागेवर नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिराचे काम सुरू झाले आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र, परिसराची गरज लक्षात घेता उर्वरित जागेवर स्वतंत्र आणि सुसज्ज महानगरपालिका दवाखान्याची इमारत उभारणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी मी आमचे नेते आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले असून, दवाखान्याच्या इमारतीचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार आहे. नागरिकांना प्राथमिक उपचारांसह आवश्यक वैद्यकीय सेवा वेळेत आणि सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
– डॉ. सुहास कांबळे, नगरसेवक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.




