“हम कर के रहेंगे, We Will Do It!”; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विकसित भारतासाठी नवा मंत्र

नवी दिल्ली | सरकारचे प्रमुख म्हणून सार्वजनिक जीवनात २५ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. दिल्लीत आयोजित एका विशेष कार्यक्रमात त्यांनी भूतकाळातील संघर्षाच्या आठवणींना उजाळा देत विकसित भारताच्या संकल्पासाठी “हम कर के रहेंगे… We Will Do It” हा नवा प्रेरणादायी नारा दिला. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवणे, जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवणे, देशाला ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब करणे आणि ऑलिम्पिकचे आयोजन करणे, या सर्व उद्दिष्टांसाठी हा आत्मविश्वासच देशाची खरी ताकद ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपल्या राजकीय आणि सामाजिक प्रवासावर भाष्य करताना पंतप्रधान म्हणाले, मी हे सांगू इच्छितो की माझ्या आयुष्यातली कुठलीही घटना व्यर्थ गेली नाही. प्रत्येक घटनेने मला काहीतरी शिकवलं. मोर्बीच्या पुराने मला दिवसरात्र सेवाकार्य कशी करायची ते शिकवलं. भूजच्या भूकंपामुळे मी पुनर्निर्माणासाठी आग्रही कसं राहिलं पाहिजे ते शिकवलं. चंद्रयानाच्या अपयशामुळे मला अपयशातून बाहेर कसं यायचं ते शिकवलं. करोना महामारीने मला सामूहिक चेतनेचं महत्त्व शिकवलं. मीडियाने मला आंबट गोड अनुभवांसह पुढे जाण्याची प्रेरणा दिली. प्रत्येक गरीब माणसाने मला हे शिकवलं की साधनं कमी असली तरीही चालेल आपली स्वप्नं मोठी असली पाहिजेत. वेदांपासून विवेकानंदांपर्यंत ज्या राष्ट्राने महान विचारांची परंपरा जपली आहे, ज्या राष्ट्राने माणसाला मानवतेचा धर्म शिकवला आहे त्या राष्ट्राची सेवा करताना मला कधीही एकाकी भाव आला नाही, मला कधीही एकटेपणा वाटलाच नाही. भारताची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे.
हेही वाचा
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल
आज मी हे सांगू इच्छितो की आजचा दिवस हा फक्त आठवणींसाठी नाही तर आपल्या संकल्पांना नव्या उर्जेने भरून टाकण्याचाही हा दिवस आहे. हा दिवस ते आश्वासन देण्याचा दिवस आहे जे आश्वासन म्हणजे हम कर के रहेंगे, We Will Do it. लाल किल्ल्यावरून मी सबका प्रयास म्हटलं होतं. भारताला नव्या उंचीवर पोहचवण्यासाठी जो जोश आणि जो आत्मविश्वास पाहिजे तो एकच संदेश देतो. हम कर के रहेंगे. We Will Do it. असं म्हणत विकसित भारतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवा मंत्र दिला आहे. २०४७ पर्यंत आपल्याला नवा भारत घडवायचा आहे आणि We Will Do it. टॉप ३ इकॉनॉमी We Will Do it. आत्मनिर्भर भारत We Will Do it, ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब, We Will Do it. ऑलिम्पिक्सचं आयोजन We Will Do it. अंतराळात पाऊल We Will Do it. ही उर्जा, हा उत्साह, हा आत्मविश्वास अत्यंत अद्भूत आहे. असा आत्मविश्वास ज्यांच्या धमन्यांमध्ये असा आत्मविश्वास रक्त म्हणून सळसळतो त्या देशाची प्रगती कुणीही रोखू शकत नाही.
सरकारचा प्रमुख म्हणून माझी २५ वर्षांची ही निरंतर यात्रा आहे. मी याकडे महिमामंडन म्हणून पाहात नाही. आजपासून २५ वर्षांपूर्वी ५० व्या वर्षापर्यंत मी आदिवासींची सेवा केली. तसंच संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न केला. मी निवडणुका लढवल्या होत्या, पण स्वतः एकही निवडणूक लढवली नव्हती. निवडणुकीच्या राजकारणात चमकायचं असतं तर खूप आधीच मैदानात उतरलो असतो. पण तो माझा स्वभाव नाही. मी आयुष्यात काय होणार? माझं काय होणार याचा विचार मी केला नव्हता. मी अँबिशनसाठी नाही मिशनसाठी आयुष्य वेचणारा माणूस आहे. मला लहान असल्यापासून हेच संस्कार मिळाले आहेत असंही मोदी यांनी म्हटलं आहे. मला ज्या जबाबदाऱ्या पक्षाने दिल्या त्या मी निभवत गेलो. माझ्या आयुष्यचं एकच ध्येय आहे ते म्हणजे देशासाठी निस्वार्थ कर्म. कारण कर्म हाच माझाच धर्म आहे असंही मोदी यांनी म्हटलं आहे.




