आकाशवाणी भवनात प्रवेश भोवला; राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली | मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काढण्यात आलेल्या निषेध मोर्चादरम्यान दिल्लीतील ‘आकाशवाणी भवन’ (ऑल इंडिया रेडिओ कार्यालय) इमारतीत विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात संबंधित कायदेशीर कलमांखाली हा एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मंगळवारी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या सुमारे २०० खासदारांनी संसदेच्या मकर द्वारापासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाच्या दिशेने पायी निषेध मोर्चा काढला होता. हा मोर्चा सुमारे ७०० मीटर अंतर कापून आकाशवाणी भवनाजवळ पोहोचताच पोलिसांनी बॅरिकेड्स लावून खासदारांना अडवले. त्यावेळी पोलिसांनी खासदारांची धरपकड सुरू केली असता राहुल गांधी यांनी बॅरिकेड्स ओलांडले. मुख्य दरवाजे बंद असले तरी प्रवेशासाठी वापरल्या जाणाऱ्या एका लहान दरवाज्यातून सुरक्षा रक्षकाला विनंती करून राहुल गांधी आत शिरले. त्यांच्या पाठोपाठ प्रियांका गांधी वाड्रा, के. सी. वेणुगोपाल आणि दीपेंद्र हुड्डा यांच्यासह इतर नेतेही इमारतीत दाखल झाले.
हेही वाचा
हरमनप्रीतनंतर स्मृती मानधनाकडे भारतीय संघाची धुरा; बीसीसीआयकडून मोठी घोषणा!
सात तासांचा ठिय्या
आकाशवाणी भवनाची इमारत निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर आहे. त्यामुळे जोपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त भेट देत नाहीत, तोपर्यंत बाहेर पडणार नाही, असा पवित्रा घेत विरोधी नेत्यांनी इमारतीच्या आवारातच ठाण मांडले. दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राहुल गांधी व इतर नेत्यांना समजावून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; मात्र नेत्यांनी तब्बल सात तास ठिय्या आंदोलन सुरू ठेवले. अखेर संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन उत्तर-पश्चिम दिल्लीतील किंग्जवे कॅम्प येथील न्यू पोलीस लाईन्स येथे हलवले. आता या विनापरवाना प्रवेशावरून दिल्ली पोलिसांनी थेट गुन्हा नोंदवला आहे.




