Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

सिंधुदुर्गातील पाणीटंचाईसाठी प्रशासन सज्ज; १५ दिवसांत अंदाजपत्रक सादर करा

वाड्या-वस्त्यांसह धरणांच्या लाभक्षेत्राबाहेरील गावांसाठी आगाऊ नियोजन; १० ऑक्टोबरपर्यंत टंचाई आराखडे अंतिम करण्याचे निर्देश

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आगाऊ नियोजन करण्यात येणार असून, आकस्मिक परिस्थितीत नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. धरणांच्या लाभक्षेत्रात नसलेल्या गावांसह जिल्ह्यातील वाड्या-वस्त्यांपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा विचार करून तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील तारिणी सभागृहात जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणी निश्चिती समितीच्या बैठकीपूर्वी झालेल्या पूर्व बैठकीत राणे बोलत होते. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यातील सद्यस्थिती, उपलब्ध पाणीस्रोत आणि संभाव्य पाणीटंचाईबाबत माहिती दिली. दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता पी. एन. पाटील यांनी जलसंपदा प्रकल्प, उपलब्ध पाणीसाठा आणि आकस्मिक पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाचे सादरीकरण केले.

ज्या गावांना किंवा शहरांना आकस्मिक पाणीपुरवठ्याची गरज भासू शकते, त्यांनी त्याबाबतची मागणी तातडीने नोंदवावी, असे राणे यांनी सांगितले. धरणांच्या लाभक्षेत्राबाहेरील गावांसाठी टँकर, स्थानिक जलस्रोत किंवा इतर तात्पुरत्या उपाययोजनांच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याच्या शक्यता तपासून त्यासाठीचे अंदाजपत्रक तयार करावे. हे अंदाजपत्रक पुढील १५ दिवसांत प्रशासनाकडे सादर करण्याचे निर्देश पाटबंधारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पाणीपुरवठा आणि नगर प्रशासन विभागाला देण्यात आले.

हेही वाचा –  दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाची मदत; रोजगार, चारा-पाणी आणि जलसंधारणाला प्राधान्य

१० ऑक्टोबरपर्यंत टंचाई आराखडे

जिल्ह्यातील सर्व वाड्या-वस्त्यांचा पाणीटंचाई नियोजनात समावेश करण्यासाठी ग्रामपंचायतींनी २ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या ग्रामसभांमध्ये पाणीटंचाईचा आढावा घ्यावा आणि टंचाई आराखडे अंतिम करावेत. हे आराखडे १० ऑक्टोबरपर्यंत जिल्हा परिषदेकडे सादर करण्याच्या सूचना राणे यांनी दिल्या.

एकही वाडी किंवा वस्ती टंचाई आराखड्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आवश्यकतेनुसार विशेष ग्रामसभा घेऊन आराखड्यांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्याची कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जलसंधारणावरही भर

संभाव्य पाणीटंचाईवर तात्पुरत्या उपाययोजनांसोबतच दीर्घकालीन उपाययोजनांवर भर देण्याच्या सूचना राणे यांनी दिल्या. पावसाचे पाणी संकलित करणे, स्थानिक जलस्रोतांचे बळकटीकरण करणे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी शाश्वत उपाययोजना राबविण्यावर भर देण्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीस लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल चोपडे, गोविंद श्रीमंगले, तिलारी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील, सिंधुदुर्ग पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप महाले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button