Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाची मदत; रोजगार, चारा-पाणी आणि जलसंधारणाला प्राधान्य

अकोला जिल्ह्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दुष्काळी भागाची पाहणी; अचूक पंचनामे करून तातडीने कार्यवाही करण्याचे प्रशासनाला निर्देश

मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे हे शासनाचे प्राधान्य असून, त्यांना भरीव मदतीसोबतच ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती, पशुधनासाठी वैरण व पाणी व्यवस्था, पेयजल उपलब्धता आणि जलसंधारणाची कामे व्यापक प्रमाणावर राबविण्यात येतील, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

दुष्काळजन्य परिस्थितीवरील उपाययोजनांसाठी महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त भागांचा प्रत्यक्ष दौरा करून परिस्थितीची पाहणी केली जात आहे. बावनकुळे यांनी अकोला तालुक्यातील येवता तसेच बाळापूर तालुक्यातील मानकी येथील दुष्काळग्रस्त परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहात शेतकरी आणि नागरिकांकडून निवेदने स्वीकारून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, महापौर शारदा खेडकर आदी उपस्थित होते.

अचूक पंचनाम्यांना प्राधान्य

केंद्र शासनाकडून अधिकाधिक मदत मिळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या निकषांचा विचार करून पीक नुकसानीचे अचूक पंचनामे होणे आवश्यक आहे. त्यामुळे पंचनामे जलद आणि अचूक पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत, असे बावनकुळे यांनी सांगितले.

पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा व पाणी, पीक पंचनामे आणि शेतीसाठी पाणीपुरवठा या बाबींना प्राधान्य देऊन प्रशासकीय यंत्रणेने समन्वयाने आणि युद्धपातळीवर कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

हेही वाचा –  एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या स्वरदा यादव चा मल्लखांब स्पर्धेत प्रथम क्रमांक

‘गावातले पाणी गावात, शिवारातले पाणी शिवारात’

केंद्र शासनाच्या मदतीसोबतच राज्य शासनाकडूनही भरीव मदत उपलब्ध करून देण्यात येईल. पीक विमा योजना आणि अन्य शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती तसेच जलसंधारणाची अधिकाधिक कामे हाती घेण्यात येतील, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

‘गावातले पाणी गावात, शिवारातले पाणी शिवारात’ या संकल्पनेनुसार पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी जलसंधारणाची कामे व्यापक प्रमाणावर राबविण्यात येणार आहेत. पेयजल उपलब्धतेसाठी पाण्याचे योग्य नियोजन केले जाईल. दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत असून, शासन आणि संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.

बँकांना शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन

दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजन निधीचा प्रभावी वापर करण्यात येईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. बँकांनी शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेऊन त्यांना सहकार्य करावे. दुष्काळी परिस्थितीत कर्जवसुलीसाठी कोणत्याही शेतकऱ्यावर सक्तीचा तगादा लावू नये, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.

अवैध सावकारांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक किंवा फसवणूक होत असल्यास नागरिकांनी न घाबरता संबंधित यंत्रणेकडे थेट अर्ज करावा, असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी

बावनकुळे यांनी येवता येथील शेतकरी शेख रशीद शेख इस्माईल तसेच बाळापूर तालुक्यातील हरिश्चंद्र शिरसाठ यांच्या शेतातील सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. शेख रजू शेख रशीद यांनी शेतात विहीर असूनही पाण्याची कमतरता आणि भूजल पातळी घटल्याची माहिती दिली.

तसेच देगाव शेतकरी बंधाऱ्यावर संजय अवचार यांच्या शेतीची पाहणी करून बावनकुळे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसोबत शिदोरी भोजनही केले. या दौऱ्यात पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button