रोजगार सेवकांचा भंडारा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा; ‘420 चा गुन्हा दाखल होईपर्यंत उठणार नाही’
नाना पटोले, आमदार अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वात आंदोलन; २४ महिन्यांचे थकीत मानधन आणि ३ ऑक्टोबर २०२४च्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीची मागणी

भंडारा : रोजगार सेवकांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस नेते नाना पटोले आणि आमदार अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वाखाली पूर्व विदर्भातील शेकडो रोजगार सेवकांनी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेल्या या मोर्चाने भंडारा पोलीस ठाण्याजवळ आक्रमक वळण घेतले. त्यानंतर मोर्चेकरी पोलीस ठाण्यात दाखल झाले. मोठ्या संख्येने आंदोलक पोलीस ठाण्यात पोहोचल्याने काही काळ प्रशासनाची धावपळ झाली. आंदोलनाची पूर्वकल्पना असल्याने पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
रोजगार सेवकांनी सरकारविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. हा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्यातून उठणार नसल्याची भूमिका नाना पटोले आणि आंदोलकांनी घेतली. त्यामुळे पोलिस प्रशासन आता काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.
ग्रामपंचायतींच्या स्तरावर कार्यरत रोजगार सेवकांवर अन्यायकारक शासन निर्णय लागू करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. रोजगार सेवकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
हेही वाचा – ‘CJPचं आंदोलन आम आदमी पार्टीचं; भाजप आणि मोदींना विरोध करण्यासाठी आंदोलन’
रोजगार सेवकांच्या प्रमुख मागण्या
-३ ऑक्टोबर २०२४च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी.
-२४ महिन्यांचे थकीत मानधन तातडीने द्यावे.
-मानधन आणि प्रवासभत्ता नियमितपणे द्यावा.
-रोजगार सेवकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारविरोधात ‘४२०’चा गुन्हा दाखल करण्याची मागणी.
-गुन्हा दाखल न झाल्यास पोलीस ठाण्यातून न उठण्याचा आंदोलकांचा इशारा.
-यासह रोजगार सेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
‘मतचोरी’च्या मुद्द्यावरही नाना पटोलेंची भूमिका
दरम्यान, नाना पटोले यांनी निवडणूक प्रक्रिया आणि मतदार यादीच्या मुद्द्यावरही काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. देशात ‘मतचोरी’ आणि लोकशाहीच्या हत्येविरोधात जे कोणी आंदोलन करतील, त्यांच्या पाठीशी काँग्रेस उभी राहील, असे त्यांनी म्हटले. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी टीका केली.
मुंबईतील मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील CJPच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पटोले यांनी ही भूमिका मांडली. दरम्यान, काँग्रेसने ४ ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या मुंबईतील निवडणूक आयोगविरोधी मोर्चात सहभागी होण्याची घोषणा केली आहे. या मोर्चात विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेबाबतच्या कथित अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे.





