ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डॉ. सुहास कांबळे यांच्या ‘प्रोफेशनल पॉलिटिक्स’ची चर्चा..!

नगरसेवक म्हणून नऊ महिन्यांत केलेल्या कामांचा अहवाल आमदार महेश लांडगे यांच्याकडे सादर

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक तथा शहर सुधारणा समितीचे सदस्य डॉ. सुहास कांबळे हे एकीकडे तज्ज्ञ डॉक्टर म्हणून तर दुसरीकडे सक्रिय लोकप्रतिनिधी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक अनुभवासोबतच राजकारणातही अभ्यासू आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यासाठी ते ओळखले जातात.

“लोकप्रतिनिधी म्हणून जनतेने आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला उत्तर देणे आणि केलेल्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडणे ही आपली जबाबदारी आहे,” या भूमिकेतून डॉ. कांबळे यांनी डिसेंबर २०२५ ते सप्टेंबर २०२६ या नऊ महिन्यांच्या कार्यकाळातील विविध विकासकामे, नागरिकांच्या समस्या आणि त्यावर केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर कार्यअहवाल तयार केला आहे.

हा कार्यअहवाल त्यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे सुपूर्द केला. लोकप्रतिनिधी म्हणून केवळ आश्वासने न देता आपल्या कार्यकाळातील कामांचा दस्तऐवजीकरण केलेला आलेख मांडण्याचा हा प्रयत्न असल्याने डॉ. कांबळे यांच्या या ‘प्रोफेशनल पॉलिटिक्स’ची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे.

डॉ. सुहास कांबळे यांनी केलेल्या कामांची केवळ नोंद न ठेवता कोणत्या विषयावर पाठपुरावा करण्यात आला, कोणती कार्यवाही झाली आणि त्यातून नागरिकांना काय फायदा झाला, याचा आढावा कार्यअहवालाच्या माध्यमातून मांडला आहे. नऊ महिन्यांच्या कामाचा दस्तऐवजीकरण केलेला हा अहवाल म्हणजे केवळ कामांची यादी नसून, लोकप्रतिनिधी म्हणून जनतेप्रती असलेल्या उत्तरदायित्वाची जाणीव अधोरेखित करणारा उपक्रम आहे, अशी भावना या निमित्ताने व्यक्त होत आहे.

हेही वाचा –  रोजगार सेवकांचा भंडारा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा; ‘420 चा गुन्हा दाखल होईपर्यंत उठणार नाही’

कामांचा लेखाजोखा मांडण्यावर भर

नगरसेवक म्हणून काम करताना परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन समस्या, मूलभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते, पाणी, ड्रेनेज, आरोग्य, नागरी सुविधा यांसह विविध विषयांवर सातत्याने पाठपुरावा करण्यावर डॉ. कांबळे यांनी भर दिला. शहरातील विविध प्रश्नांवर त्यांनी अभ्यासूपणे भाष्य करत महापालिका सभागृहात आपली भूमिका मांडली आहे. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारी आणि सूचनांची दखल घेत संबंधित प्रशासनाशी समन्वय साधून त्या सोडविण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

‘प्रोफेशनल पॉलिटिक्स’ची कार्यपद्धती

डॉक्टर म्हणून रुग्णांच्या समस्या समजून घेण्याची आणि त्यावर योग्य उपचार करण्याची सवय असलेल्या डॉ. सुहास कांबळे यांनी लोकप्रतिनिधी म्हणूनही समस्या ओळखणे, त्याचा अभ्यास करणे, प्रशासनाकडे पाठपुरावा करणे आणि त्याचा परिणाम तपासणे, या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच त्यांची राजकीय कार्यपद्धती ही ‘प्रोफेशनल पॉलिटिक्स’ म्हणून पाहिली जाते. राजकारणात सक्रिय असतानाही आपल्या कामाचे नियोजन, त्याची नोंद आणि कार्याचा अहवाल तयार करण्यावर त्यांनी दिलेला भर हा त्यांच्या कार्यपद्धतीचा महत्त्वाचा भाग मानला जात आहे.

जनतेसमोर उत्तरदायित्वाची भूमिका

लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर मतदारांशी असलेला संवाद केवळ निवडणुकीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण कार्यकाळात कायम राहावा, अशी भूमिका डॉ. कांबळे यांनी घेतली आहे. “जनतेने आपल्याला प्रतिनिधित्वाची संधी दिली आहे; त्यामुळे आपण केलेल्या कामांचा हिशोब देणे ही जबाबदारी आहे,” या विचारातून कार्यअहवालाची संकल्पना पुढे आली. आमदार महेश लांडगे यांच्याकडे कार्यअहवाल सुपूर्द करताना डॉ. कांबळे यांनी आगामी काळातही नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासकामांचा पाठपुरावा सुरू ठेवण्याची भूमिका स्पष्ट केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button