TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना दिलेले आश्वासन पाळले; सामान्य प्रशासन विभागाकडून आदेश

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराबाबत विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागणीला मोठे यश मिळाले आहे. MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची सचिवपदावरील प्रतिनियुक्ती संपुष्टात आणण्यात आली असून, त्यांची बदली करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

३० सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MPSC विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली होती. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. त्यावेळी हरपाळकर यांच्या बदलीचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यानंतर आता शासनाकडून त्यांच्या सचिवपदावरील प्रतिनियुक्ती संपुष्टात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

MPSCच्या परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून गेल्या काही काळापासून विद्यार्थी आक्रमक झाले होते. औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर पुणे, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरसह विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. MPSCचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या राजीनाम्याची मागणीही आंदोलकांकडून करण्यात आली होती.

हेही वाचा –  रोजगार सेवकांचा भंडारा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा; ‘420 चा गुन्हा दाखल होईपर्यंत उठणार नाही’

फडणवीसांच्या बैठकीनंतर आंदोलन स्थगित

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर विद्यार्थ्यांनी २ ऑक्टोबर रोजी नियोजित केलेले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याची घोषणा केली होती. सचिवांची बदली, MPSCच्या अध्यक्ष व सदस्यांच्या कामकाजाची न्यायालयीन चौकशी, परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेणे, रिक्त पदांची भरती आणि उमेदवारांसाठी ‘सिंगल कार्ड’ प्रणाली अशा विविध मुद्द्यांवर बैठकीत आश्वासने देण्यात आली.

MPSCचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या कामकाजाबाबत तीन महिन्यांत न्यायालयीन चौकशी करण्याचेही सरकारकडून सांगण्यात आले आहे. तसेच MPSCच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच सुरू ठेवण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे.

हरपाळकरांवर शाईफेक प्रकरण

दरम्यान, गेल्या महिन्यात नवी मुंबईत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून महेंद्र हरपाळकर यांच्या चेहऱ्यावर शाईफेक करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. MPSCच्या कारभारावरून विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडला होता.

या घटनेवर खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया देत तोंडाला काळे फासणे किंवा शाईफेक करणे योग्य नसल्याचे म्हटले होते. मतभेद असले तरी लोकशाही पद्धतीने प्रश्न मांडले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली होती.

दरम्यान, हरपाळकर यांची बदली झाल्यानंतर आता MPSCच्या परीक्षा प्रक्रियेतील सुधारणा आणि विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या अन्य आश्वासनांची अंमलबजावणी कशी होते, याकडे परीक्षार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button