महाराष्ट्रात सहयोगी व आरोग्यसेवा परिषदेच्या कामाला वेग; आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या शिक्षण-प्रशिक्षणाला नवी दिशा
राष्ट्रीय स्तरावरील अद्ययावत अभ्यासक्रम २०२६-२७ पासून लागू करण्याच्या हालचाली; चार स्वायत्त मंडळांच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर ‘महाराष्ट्र राज्य सहयोगी व आरोग्यसेवा परिषद’ स्थापन करण्याच्या आणि तिची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. या माध्यमातून राज्यातील सहयोगी व आरोग्यसेवा व्यावसायिकांचे शिक्षण, प्रशिक्षण, मूल्यांकन आणि नोंदणी व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यात ‘State Allied and Healthcare Council’ स्थापन करण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू करण्यात आली होती.
राज्यातील सहयोगी व आरोग्यसेवा व्यावसायिकांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने १० ऑक्टोबर २०२४ रोजी परिषदेच्या स्थापनेची अधिसूचना जारी करण्यात आल्याचे या माहितीत नमूद आहे. परिषदेचे कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी आवश्यक नियमावली तयार करण्यात आली आहे. तसेच, राष्ट्रीय स्तरावरील अद्ययावत अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून महाराष्ट्रात लागू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे.
चार स्वायत्त मंडळांची स्थापना
आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि व्यावसायिकांच्या शिक्षण व कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी परिषदेअंतर्गत चार महत्त्वपूर्ण स्वायत्त मंडळे स्थापन करण्यात येणार आहेत.
यामध्ये पदवीपूर्व सहयोगी व आरोग्यसेवा शिक्षण मंडळ, पदव्युत्तर सहयोगी व आरोग्यसेवा शिक्षण मंडळ, सहयोगी व आरोग्यसेवा व्यवसाय मूल्यांकन व मानांकन मंडळ तसेच सहयोगी व आरोग्यसेवा व्यवसाय आचारसंहिता व नोंदणी मंडळ यांचा समावेश आहे.
सहयोगी व आरोग्यसेवा क्षेत्रातील व्यावसायिकांच्या नोंदणीसंदर्भात केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने प्रक्रिया पुढे नेण्यात आली आहे. यामुळे राज्यात या क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी अधिक सुसूत्र आणि नियमनबद्ध व्यवस्था निर्माण करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
हेही वाचा – नाशिकमध्ये शिवसेनेची संघटनबांधणीसाठी नवी रणनीती; १३ तालुकाप्रमुखांना नव्या गाड्या
५० हून अधिक विषयांमध्ये प्रशिक्षण
महाराष्ट्रात फिजिओथेरपिस्ट, रेडियोग्राफर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ऑप्टोमेट्रिस्ट, आहारतज्ज्ञ यांसह ५० हून अधिक सहयोगी व आरोग्यसेवा विषयांमध्ये शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांना अद्ययावत अभ्यासक्रमानुसार शिक्षण व प्रशिक्षण मिळण्यास मदत होईल. तसेच, मूल्यांकन, मानांकन, नोंदणी आणि व्यावसायिक आचारसंहितेसाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण झाल्याने या क्षेत्रातील कार्यपद्धती अधिक सुसूत्र होण्याची अपेक्षा आहे.
आरोग्यसेवा क्षेत्राला सक्षम मनुष्यबळ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधून परिषदेचे कामकाज प्रभावीपणे राबवण्यावर भर दिला जात आहे. सहयोगी व आरोग्यसेवा क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी दर्जेदार शिक्षण, प्रशिक्षण आणि व्यावसायिक मानके विकसित करण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.
या माध्यमातून सक्षम आणि उत्तरदायी आरोग्यसेवा मनुष्यबळ तयार करण्यास मदत होऊन त्याचा लाभ भविष्यात राज्यातील आरोग्यव्यवस्था आणि रुग्णसेवेला मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





