TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘ज्ञानेश कुमार भारताचे शत्रू’; SIR वादावर अभिजीत दीपकेंचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल

‘निवडणुका घेत नाहीत, तर स्क्रिप्टिंग करतात’ असा दीपकेंचा आरोप; दोन निवडणूक आयुक्तांनी १० महिन्यांत १४ वेळा आक्षेप घेतल्याच्या अहवालाचा दाखला

नवी दिल्ली : विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIR प्रक्रियेवरून निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत राजकीय वाद तीव्र झाला आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालात निवडणूक आयोगातील दोन निवडणूक आयुक्तांनी गेल्या दहा महिन्यांत किमान १४ वेळा विविध निर्णयांवर आक्षेप नोंदवल्याचे समोर आल्यानंतर विरोधकांकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर ज्ञानेश कुमार यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. “ज्ञानेश कुमार हे भारताचे शत्रू आहेत,” असा दावा दीपके यांनी केला. तसेच, मतदार यादीतून मोठ्या प्रमाणावर नावे वगळण्यात आल्याचा दावा करत त्यांनी SIR प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले.

दीपके यांनी आणखी एका पोस्टमध्ये ज्ञानेश कुमार यांच्यावर आरोप करत, ते निवडणुका घेत नसून निवडणुकीची ‘स्क्रिप्टिंग’ करत असल्याचे म्हटले. त्यांनी विशेष सखोल पुनरीक्षणाला ‘विशेष सखोल हेराफेरी’ असे संबोधत या प्रक्रियेवर टीका केली.

हेही वाचा –  पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी (एबीडी) पदी शहर अभियंता मनोज सेठिया यांची नियुक्ती

दरम्यान, इंडियन एक्स्प्रेसच्या तपासणी अहवालानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या दहा महिन्यांत किमान १४ वेळा आयोगाच्या निर्णयांवर किंवा आदेशांवर औपचारिक आक्षेप नोंदवले. हे आक्षेप नवीन मतदारांची नोंदणी, मतदारांची नावे वगळणे व पुन्हा समाविष्ट करणे, फॉर्म-६मधील बदल तसेच मतदार यादीशी संबंधित आयटी प्रणालीच्या व्यवस्थापनासारख्या मुद्द्यांशी संबंधित असल्याचे अहवालात नमूद आहे.

अहवालानुसार, काही प्रकरणांमध्ये संधू यांनी संबंधित निर्णयांना ‘अनधिकृत’ आणि ‘बेकायदेशीर’ असल्याचे म्हटले होते. दोन्ही निवडणूक आयुक्तांनी मतदार यादीच्या डेटाबेसच्या प्रवेशाचे केंद्रीकरण होत असल्याबाबतही चिंता व्यक्त केली होती. या मुद्द्यांशी संबंधित काही बाबी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनाही कळवण्यात आल्या होत्या.

मात्र, निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी आयोगात मतभेद असल्याचा दावा फेटाळला आहे. SIRसह आयोगाचे निर्णय तिन्ही आयुक्तांच्या मान्यतेने आणि एकमताने घेण्यात आल्याचे आयोगाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

SIR प्रक्रियेवरून यापूर्वीही विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानंतर हा वाद आणखी तीव्र झाला असून, निवडणूक आयोगातील निर्णयप्रक्रिया, मतदार यादीतील बदल आणि SIRच्या अंमलबजावणीबाबत राजकीय चर्चा सुरू आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button