TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रात FDA ची धडक कारवाई; १२.१० लाखांचा बेकायदेशीर गुटखा जप्त, तिघांना अटक

नागपूर विभागात गुटखा-तंबाखूविरोधात मोठी कारवाई; राज्यभरातील १४ हॉटेल्स-उपाहारगृहांचे परवाने निलंबित, २,८१३ किलो खवा-मावा-मिठाई जप्त

मुंबई : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) संपूर्ण महाराष्ट्रात बनावट अन्नपदार्थ, भेसळ आणि अस्वच्छतेविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान नागपूर विभागात १२.१० लाख रुपयांचा बेकायदेशीर गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. या प्रकरणात वाहतुकीसाठी वापरलेली दोन वाहने ताब्यात घेण्यात आली असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा इशारा FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. अन्नपदार्थांमध्ये भेसळ किंवा इतर त्रुटी आढळल्यास नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर किंवा FDAच्या तक्रार पोर्टलवर माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मुंबईतील हॉटेल्सवरही कारवाई

अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईतील काही हॉटेल्स आणि उपाहारगृहांवरही कारवाई करण्यात आली. ग्राहकाच्या तक्रारीनंतर कुलाब्यातील प्रसिद्ध ऑलिंपिया कॉफी हाऊसचा परवाना निलंबित करण्यात आला. तपासणीदरम्यान अन्नसाठवणुकीच्या जागेजवळ मूत्रालय, झुरळे व माश्यांचा प्रादुर्भाव, मांसाचे डाग आणि अस्वच्छ पाण्याचा वापर यांसारख्या त्रुटी आढळल्याचे प्रशासनाने सांगितले.

मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयाच्या कॅन्टीनवरही अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांच्या उल्लंघनामुळे कारवाई करण्यात आली. चेंबूर येथील ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड, घाटकोपरमधील विश्वास स्वीट्स आणि A-1 ड्रायफ्रूट्स, वरळीतील मिलान पंजाब तसेच मलाडमधील सद्गुरु स्वीट्स यांच्यावरही परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली.

हेही वाचा –  पोटाची चरबी कमी करण्यासाठी जिमची गरज नाही; घरच्या घरी करा ‘हे’ ४ क्रंचेस

,८१३ किलो खवा-मावा-मिठाई जप्त

सणांच्या काळात भेसळ रोखण्यासाठी ठाणे, पालघर, पुणे आणि कोल्हापूर परिसरात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत ७.३८ लाख रुपये किमतीचा २,८१३ किलो खवा, मावा आणि मिठाईचा साठा जप्त करण्यात आला.

ठाण्यातील काशिमीरा पोलीस ठाण्यासमोर दोन वाहनांमधून अस्वच्छ आणि संशयास्पद परिस्थितीत वाहतूक केला जात असलेला ५.८६ लाख रुपयांचा खवा आणि स्वीट मावा जप्त करण्यात आला. पालघरमधील चारोटी टोल नाका, साताऱ्यातील कराड आणि कोल्हापूरमधील शिरोळ येथेही दुग्धजन्य पदार्थांवर कारवाई करण्यात आली.

२७ आस्थापनांची तपासणी

या विशेष मोहिमेदरम्यान राज्यभरातील २७ हॉटेल्स आणि उपाहारगृहांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १४ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून १३ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

याशिवाय छत्रपती संभाजीनगर येथे १.९२ लाख रुपयांची संशयास्पद मिठाई, तर अहिल्यानगर आणि नाशिक रोड परिसरात संशयास्पद गूळ आणि तूप जप्त करण्यात आले. सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी तपासणी आणि कारवाईची मोहीम सुरूच राहणार असल्याचे FDAने स्पष्ट केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button