कळव्यात खारेगाव पुलाजवळील ५ झोपड्यांना भीषण आग; मिनी गॅस सिलेंडरचा स्फोट

मुंबई | कळवा येथील खारेगाव परिसरातील तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या पाच झोपड्यांना शुक्रवारी सकाळी अचानक भीषण आग लागली. आगीदरम्यान एका मिनी गॅस सिलिंडरचा जोरदार स्फोट झाल्याने झोपड्यांचे मोठे नुकसान झाले. आग लागली त्या वेळी सर्व झोपड्या बंद असल्याने आणि आत कोणीही नसल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुमारे एका तासाच्या प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे विझवण्यात यश आले.
खारेगाव परिसरातील सहयोग सोसायटीच्या मागील बाजूस, पुलाजवळ या तात्पुरत्या झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. सकाळी ९.२३ वाजण्याच्या सुमारास येथे अचानक आग लागल्याची माहिती मिळताच जवाहरबाग अग्निशमन दलाचे एक अग्निशमन वाहन, दोन बचाव वाहने आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य राबवून सकाळी १०.३० वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली.
हेही वाचा
किंमत जास्त तरीही क्रेझ कायम! iPhone 18 Pro खरेदीसाठी मुंबई-दिल्लीत ॲपल स्टोअर्सबाहेर तुफान गर्दी
प्रशासकीय अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वाय. एम. तडवी, कळवा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त ललिता जाधव, जवाहरबाग अग्निशमन दलाचे स्थानिक अधिकारी पष्टे यांच्यासह अग्निशमन दलाचे जवान, कळवा पोलीस आणि महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेत पाचही झोपड्या जळून खाक झाल्या असून, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही; पोलीस व अग्निशमन दलाकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.





