Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर, काळजीचे कारण नाही

डिहायड्रेशनच्या त्रासामुळे उपचार सुरू; प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याकडून प्रकृतीबाबत माहिती

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना डिहायड्रेशनच्या त्रासामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी (२६ नोव्हेंबर) सकाळी ते पुण्याहून मुंबईकडे येत असताना त्यांना थकवा आणि दम लागण्याचा त्रास जाणवला. त्यामुळे नियमित तपासणीसाठी ते ब्रीच कँडी रुग्णालयात गेले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल आणि आमदार रोहित पवार यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांचा दुष्काळग्रस्त भागाचा दौरा सुरू असताना त्यांची प्रकृती बिघडली होती. कफ आणि अशक्तपणाचा त्रास जाणवल्याने त्यांना आधी पुण्यात आणि त्यानंतर मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर ते घरी परतले होते. त्यानंतर बारामती आणि पुणे दौऱ्यातील व्यस्त कार्यक्रमांमुळे पुन्हा थकवा जाणवू लागल्याची माहिती समोर आली आहे.

प्रफुल पटेल यांनी घेतली भेट

शरद पवार रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळताच खासदार प्रफुल पटेल यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना पटेल म्हणाले की, पवार साहेब रुग्णालयात दाखल झाल्याचे माध्यमांतून समजले. ते पुण्याहून कारने मुंबईला येत होते. प्रवासादरम्यान त्यांना थोडा दम लागत असल्याने त्यांनी नेहमीच्या डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्याचा निर्णय घेतला.

“मी त्यांना भेटलो, तेव्हा ते जेवत होते. त्यांनी हसून हात केला. त्यांची प्रकृती चांगली आहे. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही,” असे पटेल यांनी सांगितले. रुग्णालयातून त्यांना गुरुवारी किंवा शुक्रवारी घरी सोडले जाऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा –  दुष्काळग्रस्त अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार एक लाख रिक्षा; प्रताप सरनाईक यांची घोषणा

सुप्रिया सुळे यांच्याकडून डिहायड्रेशनची माहिती

खासदार सुप्रिया सुळे यांनीही शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. त्यांना डिहायड्रेशनचा त्रास झाला असावा. त्यांनी कामाचा वेग कमी करावा आणि प्रवासही मर्यादित ठेवावा, असे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, शरद पवार कामात इतके व्यस्त असतात की ते स्वतःच्या तब्येतीकडे पुरेसे लक्ष देत नाहीत, असेही त्यांनी म्हटले. नागरिकांनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल आणि शुभेच्छांबद्दल त्यांनी आभार मानले.

पुढील दोन दिवस उपचार सुरू राहणार

आमदार रोहित पवार यांनीही सोशल मीडियाद्वारे शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली. डिहायड्रेशनच्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आणि व्यवस्थित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील दोन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू राहतील. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत कोणीही काळजी करू नये, असे आवाहन रोहित पवार यांनी केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group