मुंबईच्या वाटेवर मनोज जरांगेंना पोलिसांची नोटीस; आंदोलनातील सहभागी, वाहनांचा तपशील मागवला
आझाद मैदानावरील उपोषणासाठी तिसऱ्यांदा अर्ज; ‘परवानगी नाकारली तर कोट्यवधी मराठे येणार’ या वक्तव्यावरही स्पष्टीकरणाची मागणी

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज १९वा दिवस असून, ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. १५ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथून त्यांनी मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले. मंगळवारी बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे त्यांचा मुक्काम होता, तर आज श्रीगोंदा येथे मुक्काम असणार आहे. दरम्यान, मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू असतानाच मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना अधिकृत नोटीस बजावली आहे.
आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी जरांगे पाटील यांच्या वतीने मुंबई पोलिसांकडे तिसऱ्यांदा अर्ज करण्यात आला आहे. यापूर्वी करण्यात आलेले दोन्ही अर्ज पोलिसांनी फेटाळले होते. तिसऱ्या अर्जानंतर पोलिसांनी नोटीस बजावत आंदोलनाबाबतची सविस्तर माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
सहभागी आणि वाहनांची माहिती मागवली
आंदोलनात सहभागी होणाऱ्या व्यक्तींची संख्या, मुंबईत येणाऱ्या वाहनांचा तपशील तसेच स्वयंसेवकांची यादी पोलिसांकडे सादर करण्यास नोटीसमधून सांगण्यात आले आहे. आंदोलनाचे नियोजन आणि संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर ही माहिती मागवण्यात आली आहे.
तसेच माध्यमांसमोर केलेल्या ‘परवानगी नाकारली तर कोट्यवधी मराठे मुंबईत येणार’ या वक्तव्याचाही नोटीसमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. परवानगी मिळाल्यानंतरही मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत येणार आहेत का, याबाबत स्पष्टता द्यावी, अशी विचारणा पोलिसांनी केली आहे.
हेही वाचा – गणेशोत्सवातही शरद पवार गटाची तातडीची बैठक; दुष्काळासह राज्यातील विविध प्रश्नांवर होणार चर्चा
आज जरांगेंची पत्रकार परिषद
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी आज दुपारी एक वाजता पत्रकार परिषद बोलावली असून, यावेळी ते आंदोलन आणि पोलिसांच्या नोटिशीबाबत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
प्रकृती खालावल्याने वैद्यकीय पथकाकडून जरांगे पाटील यांना उपचार घेण्याची विनंती करण्यात येत आहे. मात्र, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील काय भूमिका मांडतात, तसेच मुंबईकडे सुरू असलेल्या आंदोलनाबाबत पुढील दिशा काय ठरवतात, याकडे लक्ष लागले आहे.




