ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोशी कचरा डेपोवर आणखी सात गावांचा कचरा नको; ग्रामस्थांचा तीव्र विरोध

नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन; पर्यायी जागा निश्चित करण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : मोशी कचरा डेपो येथे आणखी सात गावांचा कचरा आणून टाकण्याच्या प्रस्तावाला मोशी ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. मोशी परिसरावर आधीच कचरा व्यवस्थापनाचा मोठा भार असताना त्यात आणखी भर घालू नये, अशी मागणी नगरसेवक तथा ‘क’ क्षेत्रीय कार्यालय (विजयदुर्ग) सभापती निखिल बोऱ्हाडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देऊन सात गावांचा कचरा मोशी येथे टाकण्याची कार्यवाही तात्काळ थांबवून पर्यायी जागा निश्चित करण्याची मागणी केली आहे.

मोशी कचरा डेपो परिसरात यापूर्वीपासूनच पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांमधून मोठ्या प्रमाणात कचरा आणला जातो. या परिसरात यापूर्वी गंभीर दुर्घटनाही घडली आहे. त्यामुळे कचरा डेपोच्या सुरक्षिततेचा तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आणखी सात गावांचा कचरा मोशी येथे आणणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका बोऱ्हाडे यांनी निवेदनातून मांडली आहे.

सात गावांचा कचरा मोशी येथे टाकण्याची कार्यवाही तात्काळ थांबवून, त्या गावांसाठी मोशीच्या बाहेर स्वतंत्र पर्यायी जागा निश्चित करावी. तसेच पर्यावरणपूरक आणि शास्त्रोक्त कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था उभारावी, अशी स्पष्ट भूमिका निखिल बोऱ्हाडे यांनी निवेदनातून मांडली आहे.

दुर्लक्ष झाल्यास कायदेशीर व लोकशाही मार्गाने आंदोलन

मोशी परिसरातील नागरिकांचे आरोग्य, पर्यावरण, नदी-नाले, वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील नागरी विकास या सर्व बाबींचा विचार करून प्रशासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने ग्रामस्थांच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास नागरिकांच्या हितासाठी लोकशाही व कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांनी दिला आहे.

मोशीवरील कचऱ्याचा वाढता भार, नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरणाचा प्रश्न लक्षात घेता आता प्रशासन या निवेदनावर काय भूमिका घेते, याकडे मोशी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा –  विकासकामांना गती देण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये आता ‘एमडी पॅटर्न’

८०० बेडच्या रुग्णालयासह वाढती लोकसंख्या

मोशी कचरा डेपोच्या जवळच सुमारे ८०० बेडचे रुग्णालय असून, परिसरात झपाट्याने नागरीकरण आणि लोकसंख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत कचरा डेपोचा विस्तार अथवा अतिरिक्त कचरा आणल्यास हवा, पाणी, नदी-नाले आणि एकूणच पर्यावरणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता असल्याचे बोऱ्हाडे यांनी म्हटले आहे.

‘मोशीवर आणखी कचऱ्याचा भार नको’

मोशी परिसरातील नागरिकांनी यापूर्वीच कचरा डेपोचा मोठा भार सहन केला आहे. त्यामुळे आता आणखी सात गावांचा कचरा मोशी येथे आणून टाकण्यास ग्रामस्थांचा ठाम विरोध आहे. विद्यमान कचरा व्यवस्थापनाच्या समस्या सोडविण्याऐवजी त्याच ठिकाणी अतिरिक्त कचरा आणणे हा परिसरातील नागरिकांवर अन्याय ठरेल, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.

प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याची मागणी

महानगरपालिकेने प्रथम पिंपरी-चिंचवड शहरासाठी नियोजित कचरा प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावा. त्यानंतर भविष्यात निर्माण होणाऱ्या अतिरिक्त कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र नियोजन करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

सदर सात गावांचा अद्याप पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत अधिकृत समावेश झालेला नाही, तरी या गावांचा कचरा मोशी येथे आणण्याचा घाट कशासाठी? या गावांचा कचरा सध्या मोशी येथे आणून टाकल्यास मोशी परिसरातील नागरिकांवर अतिरिक्त भार पडणार आहे. त्यामुळे समस्त मोशी ग्रामस्थांचा याला तीव्र विरोध आहे.. भविष्यात या गावांचा महापालिका हद्दीत समावेश झाला तरी त्यांच्या कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र नियोजन करून योग्य पर्यायी व्यवस्था उभारावी.

– निखिल बोऱ्हाडे, नगरसेवक, अध्यक्ष ‘क’ प्रभाग (विजयदुर्ग) क्षेत्रीय कार्यालय

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button