मंगलमय वातावरणात ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष
राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या डुडुळगाव कॅम्पसमध्ये गणरायाचे उत्साहात आगमन

डुडुळगाव, पुणे : ढोल-ताशांचा गजर, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष आणि भक्तिमय वातावरणात राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या डुडुळगाव कॅम्पसमध्ये श्री गणरायाचे उत्साहात आगमन झाले. गणरायाच्या आगमनाने संपूर्ण कॅम्पस भक्तिमय आणि आनंदमय वातावरणाने भारावून गेला.
गणेशोत्सवानिमित्त कॅम्पसमध्ये आकर्षक व पारंपरिक पद्धतीने सजावट करण्यात आली होती. विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने गणरायाचे स्वागत केले. विधिवत गणेशमूर्तीची स्थापना करून पूजा व आरती करण्यात आली.
या सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष व भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार श्री. विलासराव लांडे पाटील, सचिव श्री. सुधीर मुंगसे, खजिनदार श्री. अजित गव्हाणे, विश्वस्त श्री. विक्रांतजी लांडे व श्री. सुमित मुंगसे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच MBA महाविद्यालयाचे संचालक, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत गणरायाची आरती करण्यात आली.
हेही वाचा – UPI व्यवहारांबाबत मोठा बदल; ₹२ हजारांवरील पेमेंटवर व्यापाऱ्यांना ०.४% MDR, १५ ऑक्टोबरपासून नवा नियम
गणरायाच्या आगमनामुळे कॅम्पसमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवानिमित्त आयोजित विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एकता, सांस्कृतिक मूल्ये, सामाजिक बांधिलकी तसेच पर्यावरणपूरक उत्सवाचे महत्त्व रुजविण्याचा संदेश देण्यात आला. उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात गणरायाच्या आगमनाचा सोहळा उत्साहात संपन्न झाला.





