TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

 ‘रामायण’चे पहिले गीत ‘जय जय राम’ प्रदर्शित; भक्तीमय सुरांनी संगीतप्रवासाला सुरुवात

अरिजित सिंह-श्रेया घोषाल यांच्या स्वरात गीत साकारले; ए. आर. रहमान यांचे संगीत, डॉ. कुमार विश्वास यांचे शब्द

मुंबई : गणेश चतुर्थीच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधत बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटातील पहिले गीत ‘जय जय राम’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. भगवान श्रीगणेशाच्या आशीर्वादाने या गीताच्या माध्यमातून चित्रपटाच्या संगीतप्रवासाला सुरुवात झाली आहे. श्रीरामांना समर्पित असलेले हे भक्तिगीत प्रार्थनेची आध्यात्मिक अनुभूती आणि चित्रपटसंगीताची भावपूर्णता यांचा सुंदर मिलाफ साधते.

गीताच्या शब्दांमधून श्रीरामांची करुणा, संरक्षण आणि धर्मपालनाची भावना व्यक्त होते. ‘जय जय राम’ या नामस्मरणाची पुनरावृत्ती गीताला भक्तिभावाची मध्यवर्ती अनुभूती देते.

चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा यांनी सांगितले की, श्रीराम हे ‘रामायण’च्या केंद्रस्थानी आहेत. जीवनातील कठीण प्रसंगी सामर्थ्य आणि अनिश्चिततेच्या काळात मार्गदर्शनासाठी आपण श्रीरामांचे स्मरण करतो. याच वैयक्तिक आणि शाश्वत नात्यातून ‘जय जय राम’ साकारल्याचे त्यांनी सांगितले.

‘रामायण’ भव्य प्रमाणावर तयार होत असले तरी त्याचा पाया भावना, मूल्ये आणि भक्तीमध्ये आहे. पहिल्या गीतातून याच आत्म्याचे प्रतिबिंब उमटावे, अशी निर्मात्यांची इच्छा असल्याचे मल्होत्रा यांनी स्पष्ट केले. गणेश चतुर्थीच्या दिवशी संगीतप्रवासाची सुरुवात होणे विशेष अर्थपूर्ण असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ए. आर. रहमान यांचे संगीत

संगीतकार ए. आर. रहमान यांनी ‘जय जय राम’मध्ये श्रीरामांच्या नामस्मरणाची साधी आणि प्रभावी भावना केंद्रस्थानी ठेवली आहे. प्रार्थनेची शुद्धता आणि आत्मीयता जपत या भावनेचा चित्रपटगीताच्या माध्यमातून विस्तार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. कुमार विश्वास यांच्या शब्दांना अरिजित सिंह आणि श्रेया घोषाल यांनी भावपूर्ण स्वर दिले आहेत. गीत ऐकताना प्रेक्षकांना मनःशांतीचा अनुभव मिळावा आणि त्यांना या गीताशी वैयक्तिक नाते जोडता यावे, अशी अपेक्षा रहमान यांनी व्यक्त केली.

हेही वाचा –  मोशी कचरा डेपोवर आणखी सात गावांचा कचरा नको; ग्रामस्थांचा तीव्र विरोध

तीन शब्दांत संपूर्ण प्रार्थना’

डॉ. कुमार विश्वास यांनी ‘जय जय राम’ हे तीन साधे शब्द असले तरी त्यामध्ये संपूर्ण प्रार्थना सामावलेली असल्याचे म्हटले. श्रीरामांचे वर्णन करण्याऐवजी प्रत्येक भक्ताचे श्रीरामांशी असलेले नाते, तसेच मार्गदर्शक, सामर्थ्य आणि आश्रय म्हणून त्यांच्याकडे पाहण्याची भावना शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, ‘रामायण’च्या यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ध्वनिचित्रफितीला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे. या ध्वनिचित्रफितीने सहा दिवसांत विविध डिजिटल माध्यमांवर एक अब्जाहून अधिक व्ह्यूजचा टप्पा पार केल्याचा दावा करण्यात आला आहे.

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’मध्ये रणबीर कपूर श्रीरामांच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, यश रावणाच्या भूमिकेत, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

नमित मल्होत्रा यांच्या Prime Focus Studiosच्या निर्मितीत DNEG आणि यश यांच्या Monster Mind Creationsच्या सहकार्याने हा चित्रपट तयार होत आहे. भारताबाहेरील वितरणाची जबाबदारी Sony Picturesकडे आहे. ‘रामायण : भाग १’ हा दोन भागांच्या चित्रपट मालिकेतील पहिला भाग असून, तो दिवाळी २०२६मध्ये जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button