ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दिघी आणि चऱ्होली-चोविसावाडी येथील प्रस्तावित कचरा प्रक्रिया प्रकल्प रद्द करा..!

ई प्रभाग अध्यक्षा अर्चना सस्ते यांचा तीव्र विरोध; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे प्रकल्प रद्द करण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : ई-प्रभाग (शिवनेरी) क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील दिघी तसेच चऱ्होली-चोविसावाडी परिसरात प्रस्तावित करण्यात आलेले कचरा प्रक्रिया प्रकल्प तात्काळ रद्द करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी ई-प्रभागाच्या प्रभाग अध्यक्षा तथा नगरसेविका अर्चना सस्ते यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. मोशी कचरा डेपोचा मोठा भार आधीपासूनच या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नागरिक सहन करत असताना, याच परिसरात आणखी दोन कचरा प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित करणे अन्यायकारक असल्याचे सस्ते यांनी स्पष्ट केले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी विविध ठिकाणी नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये ई-प्रभाग (शिवनेरी) क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील दिघी आणि चऱ्होली-चोविसावाडी या परिसरांचाही समावेश असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सस्ते यांनी महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत या दोन्ही ठिकाणचे प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली आहे.

अर्चना सस्ते यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत.

१. दिघी आणि चऱ्होली-चोविसावाडी येथील प्रस्तावित कचरा प्रक्रिया प्रकल्प तात्काळ रद्द करावेत.
२. मोशी कचरा डेपोचा विद्यमान भार लक्षात घेऊन ई-प्रभाग (शिवनेरी) क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कोणताही नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित करू नये.
३. मोशी कचरा डेपोमुळे ई-प्रभागावर आधीपासून असलेला घनकचरा व्यवस्थापनाचा भार अधिकृतपणे विचारात घ्यावा.

हेही वाचा –  ‘रामायण’चे पहिले गीत ‘जय जय राम’ प्रदर्शित; भक्तीमय सुरांनी संगीतप्रवासाला सुरुवात

मोशी कचरा डेपोचा भार आधीच ई-प्रभागावर

ई-प्रभागाच्या हद्दीतच मोशी कचरा डेपो कार्यरत असून, पिंपरी-चिंचवड शहरातील मोठ्या प्रमाणातील कचरा अनेक वर्षांपासून या ठिकाणी आणला जात आहे. त्यामुळे मोशीसह दिघी, डुडुळगाव, चऱ्होली, चोविसावाडी आणि लगतच्या परिसरातील नागरिकांना दुर्गंधी, धूर, धूळ, माश्या, डास, वाहतूक कोंडी, प्रदूषण तसेच आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे सस्ते यांनी निवेदनात नमूद केले आहे.

त्यामुळे एका बाजूला या परिसरातील नागरिक आधीपासूनच कचरा व्यवस्थापनाचा परिणाम सहन करत असताना, त्याच क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आणखी दोन कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव म्हणजे स्थानिक नागरिकांवरील कचऱ्याचा भार आणखी वाढविण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला एक प्रकल्प’ या आश्वासनाची आठवण

मोशी कचरा डेपोवर सुमारे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या दुर्घटनेनंतर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घनकचरा व्यवस्थापनाच्या विकेंद्रीकरणाबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी शहरातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत प्रत्येकी एक कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा दाखला सस्ते यांनी दिला आहे.

घनकचरा व्यवस्थापनाचा भार सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये समान आणि न्याय्य पद्धतीने विभागण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, अनेक क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत कचरा प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित नसताना मोशी कचरा डेपोचा भार आधीपासूनच सहन करणाऱ्या ई-प्रभागातच आणखी दोन प्रकल्प प्रस्तावित करणे हे या भूमिकेशी विसंगत असल्याचे सस्ते यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

‘अन्यथा तीव्र जनआंदोलन’

ई-प्रभागातील नागरिकांचे आरोग्य, पर्यावरण आणि परिसराचे भवितव्य लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने या प्रस्तावांबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी सस्ते यांनी केली आहे. प्रस्तावित प्रकल्पांच्या जागा रद्द न केल्यास ई-प्रभागातील स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन उभारावे लागेल, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

ई-प्रभाग (शिवनेरी) क्षेत्रीय कार्यालयाची अध्यक्षा आणि परिसराची लोकप्रतिनिधी या नात्याने दिघी तसेच चऱ्होली-चोविसावाडी येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पांना आपला तीव्र विरोध आहे. महापालिका प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन, वैज्ञानिक आणि विकेंद्रित नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र, एका विशिष्ट परिसरावरच कचरा व्यवस्थापनाचा अतिरिक्त भार टाकण्याऐवजी शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तो समान पद्धतीने विभागला जाणे गरजेचे आहे.

– अर्चना सस्ते, सभापती, ई-प्रभाग (शिवनेरी) क्षेत्रीय कार्यालय, तथा नगरसेविका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group