TMCचे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? बसुनियांच्या दाव्याने बंगालच्या राजकारणात खळबळ

TMC Rebel MPs BJP Join Claim | पश्चिम बंगालमधील सत्ता गमावल्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) पडलेली उभी फूट आता आणखी रुंदावताना दिसत आहे. तृणमूलमधून बाहेर पडत ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ (NCPI) मध्ये गेलेल्या २० बंडखोर खासदारांपैकी तब्बल १७ खासदार ऑक्टोबर महिन्यात म्हणजेच आगामी दुर्गापूजेपूर्वी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक दावा खासदार जगदीश चंद्र बर्मा बसुनिया यांनी केला आहे. मात्र, या दाव्यानंतर बंडखोर खासदारांच्या गटामध्येच उघड मतभेद समोर आले आहेत.
कूचबिहारचे खासदार जगदीश चंद्र बर्मा बसुनिया यांनी सांगितले की, तृणमूल सोडल्यानंतर सुरुवातीला थेट भाजपमध्येच सामील होण्याची योजना होती. मात्र, अबू ताहेर आणि इतर दोन खासदारांच्या विरोधामुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे तात्पुरता मार्ग म्हणून अमान्यताप्राप्त अशा ‘एनसीपीआय’ पक्षात प्रवेश करण्यात आला. आता बहुमताने निर्णय झाला असून, १७ खासदार भाजपात प्रवेश करतील आणि इतर जे करतील त्याचा मार्ग मलाही स्वीकारावा लागेल, असे बसुनिया म्हणाले.
हेही वाचा
लंडनच्या थेम्स नदीच्या काठावर भव्य ‘गंगा आरती’; मंत्रोच्चार अन् दिव्यांच्या प्रकाशाने परिसर उजळला
बसुनिया यांच्या दाव्यानंतर फुटीर गटातील इतर खासदारांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. खासदार अबू ताहेर खान यांनी, “बसुनिया यांना आमच्या वतीने बोलण्याचा कोणताही अधिकार दिलेला नाही, आम्ही भाजपात जाणार नाही हे आधीच अनेकदा स्पष्ट केले आहे,” असे ठणकावले. तर खासदार शताब्दी रॉय आणि अरुप चक्रवर्ती यांनी अशा कोणत्याही संभाव्य निर्णयाची आपल्याला अजिबात कल्पना नसल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे, मुर्शिदाबाद भागातील खासदार अबू ताहेर खान, खलीलुर रहमान आणि युसूफ पठाण हे एनसीपीआयमध्ये सामील झालेले असले, तरी ते आतापर्यंत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या (NDA) बैठकांपासून सातत्याने दूरच राहिले आहेत.
भाजपकडून शक्यता कायम
या संभाव्य पक्षप्रवेशावर पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांनी थेट पुष्टी दिली नसली तरी शक्यता पूर्णपणे फेटाळलेली नाही. “कोणालाही भाजपात येण्याची इच्छा असू शकते; मात्र अशा प्रवेशाचा अंतिम निर्णय पक्षाच्या वरिष्ठ आणि सर्वोच्च स्तरावर घेतला जातो,” अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.




