लंडनच्या थेम्स नदीच्या काठावर भव्य ‘गंगा आरती’; मंत्रोच्चार अन् दिव्यांच्या प्रकाशाने परिसर उजळला

Ganga Aarti Thames River London | ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये रविवारी एक अभूतपूर्व आणि नयनरम्य सोहळा पाहायला मिळाला. भारताची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख असलेल्या वाराणसीच्या घाटांवरील आरतीप्रमाणेच, लंडनमधील प्रसिद्ध थेम्स नदीच्या काठावर पहिल्यांदाच भव्य ‘गंगा आरती’चे आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो भारतीय व स्थानिक नागरिक उपस्थित होते. दीपप्रज्वलन, पारंपरिक संगीत आणि मंत्रोच्चारांनी थेम्सचा परिसर पूर्णपणे भक्तिमय झाला होता.
‘चिन्मय मिशन यूके’ला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आणि ‘टोटली थेम्स फेस्टिव्हल’च्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘गंगा आरती ऑन द थेम्स: अ सेलिब्रेशन ऑफ लाईट’ असे या सोहळ्याचे नाव ठेवण्यात आले होते. संस्थेच्या जगभरात सुरू असलेल्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांचाच हा एक भाग होता.
हेही वाचा
वृंदावनच्या प्रेम मंदिराच्या प्रतिकृतीत ‘श्रीमंत दगडूशेठ’ गणपती बाप्पा विराजमान
Ganga Aarti was held on the River Thames in 🇬🇧 London for the first time. pic.twitter.com/d9ZxKfpHhW
— Harpreet Sandhu (@TheHarpreetTake) September 14, 2026
चिन्मय मिशन यूकेच्या निवासी शिक्षिका श्रीप्रिया चैतन्य यांनी या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले, “पिढ्यानपिढ्या लोक गंगेच्या काठावर एकत्र येऊन जीवन, निसर्ग आणि सृष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ज्योत अर्पण करतात. थेम्स नदीवरील गंगा आरतीमागेही हीच एकता, कृतज्ञता आणि आशेची भावना आहे. चिन्मय मिशनसाठी गंगा नदी ही ज्ञानाच्या अखंड प्रवाहाचे प्रतीक मानली जाते.”
पर्यावरणाची संपूर्ण काळजी; पाण्यात दिवे न सोडता जमिनीवरच विधी
या भव्य कार्यक्रमादरम्यान पर्यावरण आणि नदीच्या स्वच्छतेची काटेकोर काळजी घेण्यात आली होती. हा संपूर्ण विधी केवळ नदीकाठावरच पार पडला. परंपरेचा मान राखतानाच थेम्स नदीच्या पर्यावरणाला कोणताही धक्का लागू नये म्हणून पूजेचे साहित्य किंवा पेटवलेले दिवे नदीच्या पाण्यात न सोडता काठावरच सुरक्षितपणे ठेवण्यात आले होते, अशी माहिती आयोजकांनी दिली.




