जरांगेंचे गैरसमज लवकरच दूर करू; प्रत्यक्ष भेट घेणार : मंत्री शंभूराज देसाई
‘जरांगे जे बोलतात ते पूर्ण सत्य नाही, अर्धसत्य’; सुप्रिया सुळेंकडूनही संवादातून मार्ग काढण्याचे आवाहन

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आंदोलनावर ठाम आहेत. मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावरील आंदोलनाला दुसऱ्यांदा परवानगी नाकारली असतानाही आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री शंभूराज देसाई यांनी जरांगे पाटील यांची लवकरच प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचे सांगितले.
मनोज जरांगे पाटील ज्या काही गोष्टी सांगतात, त्या पूर्ण सत्य नसून काही बाबतीत अर्धसत्य आणि गैरसमज असल्याचे देसाई यांनी म्हटले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी सरकारच्या पातळीवर प्रामाणिकपणे प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘सातारा गॅझेट आणि कुणबी नोंदींवर कायदेशीर प्रक्रिया’
सातारा गॅझेट तसेच ५८ लाख कुणबी नोंदी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकार नियमानुसार आणि गांभीर्याने कायदेशीर पावले उचलत असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.
जरांगे पाटील यांच्या मनातील गैरसमज प्रत्यक्ष भेटीत दूर केले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे सरकार आणि जरांगे यांच्यातील संवादाला पुन्हा चालना मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – कमी बजेट, दमदार कथा अन् उत्कृष्ट अभिनय; IMDbवर ८.२ रेटिंग असलेला ‘हा’ सिनेमा नक्की पाहा
‘त्यांची समजूत काढली पाहिजे’; सुप्रिया सुळे
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर भूमिका मांडली. राज्यात कोणत्याही समाजाचे किंवा घटकाचे आंदोलन सुरू असताना सरकारची जबाबदारी संवाद साधण्याची आहे. मागण्या मान्य असोत किंवा नसोत, लोकशाहीमध्ये चर्चा झाली पाहिजे, असे सुळे यांनी सांगितले.
स्थानिक नेते आणि जबाबदार व्यक्तींना पाठवून आंदोलकांची समजूत काढली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. जरांगे पाटील, ओबीसी समाज, MPSC विद्यार्थी आणि आदिवासी विद्यार्थी विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या ना कोणत्या प्रश्नावर आंदोलन सुरू आहे. त्यामुळे सरकारने प्रत्येक घटकाशी चर्चा करून मार्ग काढला पाहिजे, असे आवाहन सुळे यांनी केले.
परवानगी नाकारल्यानंतर जरांगे काय करणार?
मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर उपोषणाला दुसऱ्यांदा परवानगी नाकारल्याने आता मनोज जरांगे पाटील नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परवानगी नाकारली असली तरी आपण मुंबईला जाणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.
आपल्यासोबत इतर कुणीही मुंबईला येणार नसून आपण एकट्याने उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी कायदेशीर आणि सुरक्षेच्या कारणांचा दाखला देत परवानगी नाकारली आहे. त्यामुळे जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहत मुंबई गाठणार की न्यायालयात दाद मागणार, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.




