‘जरांगेंनी सणासुदीच्या काळात सबुरीने घ्यावे’; रामदास कदम यांचा आंदोलनावरून सल्ला
‘१४ मागण्या मान्य, दोन मागण्यांवर सरकार प्रयत्नशील’; मराठा समाजाला न्याय देताना ओबीसींवर अन्याय होऊ नये, अशी सरकारची भूमिका योग्य असल्याचे कदम यांचे मत

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले असून, आज त्यांच्या उपोषणाचा १७ वा दिवस आहे. तसेच, येत्या १९ सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी जरांगे पाटील यांनी सध्याच्या सणासुदीच्या काळात सबुरीने घ्यावे, असे आवाहन केले आहे.
रामदास कदम म्हणाले की, सध्या राज्यात उत्सवाचे वातावरण आहे. जरांगे पाटील यांनी थोडे धीराने आणि दमानं घ्यावे. त्यांच्या १४ मागण्या मान्य झाल्या आहेत, तर अन्य दोन मागण्यांच्या बाबतीतही सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे त्यांनी थोडी सबुरीची भूमिका घ्यावी, असे कदम यांनी म्हटले.
मराठा समाजाला न्याय देताना ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये, ही शासनाची भूमिका योग्य असल्याचेही रामदास कदम यांनी स्पष्ट केले. सरकारने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले असून, सणासुदीच्या काळात आंदोलनाची भूमिका काही काळासाठी संयमाने हाताळावी, असे त्यांनी सुचवले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी त्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे जरांगे पाटील मुंबईत दाखल होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकारकडूनही त्यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती करण्यात आली आहे. मात्र, जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
हेही वाचा – कमी बजेट, दमदार कथा अन् उत्कृष्ट अभिनय; IMDbवर ८.२ रेटिंग असलेला ‘हा’ सिनेमा नक्की पाहा
‘मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण व्हावे’
दरम्यान, रामदास कदम यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरही नाराजी व्यक्त केली. या महामार्गाच्या कामाबाबत आपल्याला अतिशय वेदना आणि दुःख होत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम मार्गी लागावे यासाठी आपण तत्कालीन बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याशी वाईटपणा घेतला होता, असे कदम यांनी सांगितले. हा महामार्ग लवकर पूर्ण व्हावा, यासाठी त्यांनी गणपती बाप्पाकडे साकडेही घातले.
“बाप्पा, पुढच्या वर्षी येशील तेव्हा हा महामार्ग पूर्ण झालेला असू दे,” अशी प्रार्थना केल्याचे रामदास कदम यांनी सांगितले. रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग कोणालाही शोभा देणारा नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याकडे लक्ष देऊन महामार्गाचे काम पूर्ण करून घ्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हिंदी भाषेबाबतच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास रामदास कदम यांनी तूर्तास टाळाटाळ केली. अमित शाह यांचा नेमका उद्देश काय होता, हे पाहिल्यानंतरच यावर बोलू, असे त्यांनी स्पष्ट केले.





