दिलजीत दोसांझच्या मुंबईतील कॉन्सर्टला मनसेचा विरोध; कार्यक्रम रद्द करण्याची मागणी
ड्रग्ज सेवनाच्या शक्यतेचा मनसेचा आरोप; कॉन्सर्ट रद्द न केल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ याच्या आगामी मुंबई कॉन्सर्टवरून वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या कार्यक्रमाला विरोध दर्शवत तो रद्द करण्याची मागणी केली आहे. महालक्ष्मी रेसकोर्स आणि एनएससीआय डोम येथे होणाऱ्या कॉन्सर्टमध्ये अमली पदार्थांचे सेवन आणि विक्री होण्याची शक्यता असल्याचा आरोप मनसेने केला आहे. यासंदर्भात पक्षाचे पदाधिकारी ताडदेव पोलिसांना निवेदन देणार असून, कार्यक्रम रद्द न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मनसेच्या म्हणण्यानुसार, महालक्ष्मी रेसकोर्सवरील कॉन्सर्टच्या नव्या हंगामातील पहिल्याच कार्यक्रमात अमली पदार्थ सेवन केल्याच्या संशयावरून १२ जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आगामी कॉन्सर्टमध्येही अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घ्यावी, अशी मागणी पक्षाने केली आहे.
हेही वाचा – मुंबईत अन्न व औषध प्रशासनाची हॉटेलांवर मोठी कारवाई; १० परवाने निलंबित
ड्रग्ज सेवनामुळे तरुणाच्या मृत्यूचा दावा
गेल्या वर्षी याच ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात अमली पदार्थांच्या सेवनामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा दावा मनसेने केला आहे. अशा घटना घडूनही या ठिकाणी वारंवार कार्यक्रम आयोजित केले जात असल्याबद्दल पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. कॉन्सर्टनंतर काही तरुण-तरुणी नशेच्या अवस्थेत रस्त्यावर फिरताना दिसतात, असा आरोपही मनसेने केला आहे. यामुळे स्थानिक तरुणांवर विपरीत परिणाम होत असल्याच्या तक्रारी पालकांनी पक्षाकडे केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
वाहतूक कोंडीचाही मुद्दा उपस्थित
कॉन्सर्टमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे मनसेने म्हटले आहे. मनसेचे विभाग अध्यक्ष दिनेश ज्ञानेश्वर पुंडे हे ताडदेव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देणार आहेत. महालक्ष्मी रेसकोर्स आणि एनएससीआय डोम येथे भविष्यात म्युझिकल कॉन्सर्ट आयोजित करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी पक्षाकडून करण्यात येणार आहे. अशा कार्यक्रमांना पोलिसांकडून परवानगी आणि संरक्षण दिले जात असल्याने आयोजकांना प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोपही मनसेने केला आहे.




