‘जरांगे नव्हे, दुष्काळाचा मुद्दा महत्त्वाचा’; चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य
मुंबईतील आंदोलन टाळण्याचे आवाहन; ‘मराठा-ओबीसी कोणाचाही हक्क डावलता येणार नाही’

नागपूर : राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची चर्चा सुरू असतानाच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सध्या राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती अधिक महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील सध्या काय करतात किंवा त्यांची भूमिका काय आहे, यापेक्षा राज्यातील दुष्काळाची परिस्थिती महत्त्वाची आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
शनिवारी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असून काही भागांत पिके करपण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले. सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली असून, पुन्हा बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
‘मुंबईत आंदोलन करणे योग्य नाही’
मनोज जरांगे पाटील यांच्या संभाव्य मुंबई आंदोलनाबाबत बोलताना बावनकुळे यांनी आंदोलकांना मुंबईत आंदोलन टाळण्याचे आवाहन केले. मुंबईतील आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले निर्णय लक्षात घेता सर्वांनी याबाबत काळजी घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
‘गणेशोत्सव हा मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण आहे. या काळात कोणीही आंदोलन करू नये,’ असे आवाहन बावनकुळे यांनी केले.
हेही वाचा – लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा ‘मराठमोळा’ अंदाज; वडापाववर मारला ताव, फोटो व्हायरल
‘मराठा आणि ओबीसींचा हक्क डावलता येणार नाही’
मराठा किंवा ओबीसी समाज असो, कोणाचाही हक्क डावलता येणार नाही, अशी सरकारची भूमिका असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत अनेक निर्णय घेतले असून सरकार मराठा समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेत काम करत असल्याचा दावा त्यांनी केला.
सरकारला काही वेळ दिला पाहिजे, असे सांगत त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संयम ठेवण्याचे आवाहन केले.
‘शेतकऱ्यांच्या मदतीला सरकार ठाम’
दरम्यान, राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीवर सरकारचे लक्ष असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये कमी पावसामुळे पिकांवर परिणाम झाला असून शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल, यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे तातडीने सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि संबंधित यंत्रणा परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. आपणही काही जिल्ह्यांचा दौरा करून परिस्थितीची पाहणी करणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
राज्याची संपूर्ण परिस्थिती समोर आल्यानंतर आगामी मंत्रिमंडळ बैठकीत त्याचा आढावा मांडला जाईल. नियमावलीनुसार शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारची भूमिका असून, शेतकरी आत्महत्या करणार नाहीत यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.





