IIBM कॉलेजमध्ये ‘फ्रेशर्स पार्टी’ उत्साहात साजरी; ‘प्रारंभ’ मासिकाचे अनावरण

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :
आय आय बी एम कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटतर्फे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘फ्रेशर्स पार्टी’चे (स्वागत समारंभ) आयोजन चिखली येथील इंद्रप्रस्थ हॉलमध्ये मोठ्या जल्लोषात करण्यात आले. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणि बॉलिवूड वेशभूषेने उपस्थितांची मने जिंकली. याच कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या “प्रारंभ” या नव्या मासिकाचे अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर, संचालिका व नगरसेविका सौ. शीतल वर्णेकर, प्राचार्य प्रा. प्रदीप फुलकर, विभाग प्रमुख अमोल भागवत, प्रतीक्षा डफळ, प्रा. अनिकेत वंजारी, संदीप जाधव यांच्यासह सर्व को-ऑर्डिनेटर व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.
हेही वाचा – लंडनमध्ये विराट कोहलीची एकनाथ शिंदेंशी भेट; महाराष्ट्राच्या विकासासह युवा प्रतिभेला व्यासपीठ देण्यावर चर्चा
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन
डॉ. धनंजय वर्णेकर यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरविषयक मोलाचे मार्गदर्शन केले, तर प्राचार्य प्रा. प्रदीप फुलकर यांनी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील यशाचा मूलमंत्र दिला. विभागप्रमुख अमोल भागवत यांनी “ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी संस्था सदैव सोबत आहे” असा विश्वास देत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विभागप्रमुख प्रतीक्षा डफळ यांनी विद्यार्थ्यांच्या वेशभूषेचे कौतुक करत त्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे प्रोत्साहन दिले.
’प्रारंभ’ मासिकाचे अनावरण
या वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या “प्रारंभ” या मासिकाची अधिकृत घोषणा करून मान्यवरांच्या हस्ते हस्त-पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. “विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना आणि व्यावसायिक यशाला व्यक्त करणारे हे एक नवे दालन ठरेल,” असे उद्गार प्रा. अनिकेत वंजारी यांनी काढले.
हा सोहळा अतिशय उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मिलिंद उशीर यांनी केले, तर प्रा. श्रीनिवास यांनी आभार मानले.




