TOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयक्रिडाताज्या घडामोडी

लंडनमध्ये विराट कोहलीची एकनाथ शिंदेंशी भेट; महाराष्ट्राच्या विकासासह युवा प्रतिभेला व्यासपीठ देण्यावर चर्चा

क्रीडा, पायाभूत सुविधा आणि सरकारी योजनांवर संवाद; ‘एवढा मोठा क्रिकेटपटू असूनही विराट अतिशय साधा’ म्हणत शिंदेंकडून कौतुक

लंडन : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शुक्रवारी लंडनमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान क्रीडा क्षेत्रासह महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, सरकारी योजना आणि युवा प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली.

या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी एएनआयशी बोलताना विराट कोहलीचे कौतुक केले. एवढा मोठा क्रिकेटपटू असूनही विराट अतिशय साधा आणि जमिनीवर पाय असलेला व्यक्ती असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

“मी लंडनमध्ये असल्याचे विराटला समजल्यानंतर तो मला भेटायला आला. एवढा मोठा भारतीय क्रिकेटपटू आणि सर्वाधिक शतकं करणारा खेळाडू असूनही तो किती साधा आहे, हे पाहून मला आनंद झाला. आमची यापूर्वीही भेट झाली आहे; मात्र आजची थेट चर्चा विशेष चांगली झाली,” असे शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या विकासावरही चर्चा

या भेटीत महाराष्ट्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती विराट कोहलीला देण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासावरही दोघांमध्ये चर्चा झाली. थर्ड मुंबई प्रकल्प, अटल सेतू, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, मेट्रो तसेच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांबाबत यावेळी चर्चा झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात झालेल्या विकासकामांबाबत विराट कोहलीनेही सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे शिंदे यांनी नमूद केले.

हेही वाचा –  राणी मुखर्जीच्या मराठमोळ्या अंदाजाचं फडणवीसांकडून कौतुक; महाराष्ट्राच्या पर्यटनासाठी खास आवाहन

युवा प्रतिभेला संधी देण्यावर भर

या भेटीत केवळ क्रिकेट किंवा राजकारणापुरती चर्चा मर्यादित राहिली नाही. नव्या पिढीतील खेळाडू आणि विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांना पुढे आणण्यासाठी तसेच त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी काय करता येईल, यावरही चर्चा झाली. याबाबत विराट कोहलीने काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

१५ हजार वनडे धावांचा टप्पा जवळ

दरम्यान, विराट कोहली सध्या आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १०० शतकांच्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल करत आहे. सचिन तेंडुलकरनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकांचा टप्पा गाठणारा तो दुसरा फलंदाज ठरू शकतो.

विराटच्या नावावर सध्या ८५ आंतरराष्ट्रीय शतकं आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याने ३१४ सामन्यांतील ३०२ डावांमध्ये १४,९४१ धावा केल्या असून त्याच्या नावावर ५४ शतकं आणि ७९ अर्धशतकं आहेत. त्यामुळे वनडेमध्ये १५ हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला आणखी ५९ धावांची गरज आहे.

यावर्षी वनडेमध्ये विराटने सहा डावांत ३८४ धावा केल्या असून त्याची फलंदाजीची सरासरी ६४ आहे. आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याला आणखी सामने खेळण्याची संधी मिळणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button