TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

भारत-रशिया मैत्रीला नवी दिशा; मोदी-पुतीन यांच्यात द्विपक्षीय बैठक, २०३० पर्यंत १०० अब्ज डॉलर व्यापाराचे लक्ष्य

BRICS Summit 2026 पूर्वी मोदींनी पुतीन यांचे गळाभेट घेत केले स्वागत; उद्योग, रेल्वे, अणुऊर्जा, क्रिटिकल मिनरल्स आणि खत क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा

नवी दिल्ली : भारताच्या यजमानपदाखाली १८व्या BRICS शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, १२ आणि १३ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ही परिषद पार पडणार आहे. शिखर परिषदेला सुरुवात होण्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्यात भारत मंडपम येथे द्विपक्षीय बैठक सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांचे गळाभेट घेत स्वागत केले.

या बैठकीत भारत आणि रशियामधील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासह व्यापार आणि आर्थिक सहकार्यावर विशेष चर्चा होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमधील व्यापार २०३० पर्यंत १०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य असून, त्यासाठी विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

उद्योगापासून अणुऊर्जेपर्यंत सहकार्य

मोदी-पुतीन चर्चेत औद्योगिक सहकार्य, रेल्वे प्रकल्प, स्टील उद्योग, नागरी अणुऊर्जेचा वापर, क्रिटिकल मिनरल्स, कुशल मनुष्यबळाचे स्थलांतर आणि खत क्षेत्रातील भागीदारी या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफविषयक इशाऱ्यांच्या आणि आखाती देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत BRICS बिझनेस फोरमचे आयोजन करण्यात आले. यामध्ये BRICS सदस्य आणि भागीदार देशांमधील व्यापार अधिक मजबूत करण्यावर भारताने भर दिला.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी BRICS देशांनी एकमेकांसाठी बाजारपेठा अधिक खुल्या कराव्यात आणि व्यापाराशी संबंधित नियम सुलभ करावेत, असे आवाहन केले. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही बदलत्या जागतिक परिस्थितीत BRICS देशांमधील सहकार्य अधिक वाढण्याची गरज व्यक्त केली. पीयूष गोयल आणि एस. जयशंकर यांनी रशियाचे मंत्री मॅक्सिम रेशेतनिकोव यांचे स्वागत केले.

हेही वाचा –  मनोज जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

BRICSमध्ये भारताची महत्त्वाची भूमिका

पीयूष गोयल यांनी BRICS देशांच्या अर्थव्यवस्थेत व्यापाराची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. BRICS देशांमध्ये जगातील सुमारे ५० टक्के लोकसंख्या असून जागतिक GDP मध्ये या देशांचा मोठा वाटा आहे. जागतिक व्यापारातही BRICS देशांचे महत्त्व वाढत आहे.

भारताच्या उत्पादन निर्यातीत अभियांत्रिकी वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक्सचा मोठा वाटा आहे. याशिवाय औषधनिर्मिती क्षेत्रात भारताची क्षमता मोठी असून, BRICS सदस्य देशांच्या औषधविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

BRICSमध्ये कोणते देश?

BRICS या संक्षिप्त नावात सुरुवातीला ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश होता. २००६ मध्ये या गटाची सुरुवात झाली, तर पहिली BRICS शिखर परिषद १६ जून २००९ रोजी झाली.

सध्याच्या विस्तारानंतर इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात हे देशही BRICSचे सदस्य आहेत.

याशिवाय बेलारुस, बोलीव्हिया, कझाकिस्तान, क्युबा, मलेशिया, नायजेरिया, थायलँड, युगांडा, उझबेकिस्तान आणि व्हिएतनाम हे भागीदार देश आहेत.

ट्रम्प यांचा टॅरिफचा इशारा

BRICS देशांकडून डॉलरचे महत्त्व कमी करण्याच्या प्रयत्नांबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी तीव्र भूमिका घेतली होती. BRICS देशांनी डॉलरचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केल्यास १०० टक्के टॅरिफ लावण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला होता.

या पार्श्वभूमीवर भारताच्या यजमानपदाखाली होत असलेली BRICS परिषद आर्थिक सहकार्य, व्यापार, जागतिक वित्तीय व्यवस्था आणि बदलत्या भू-राजकीय परिस्थितीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button