राणी मुखर्जीच्या मराठमोळ्या अंदाजाचं फडणवीसांकडून कौतुक; महाराष्ट्राच्या पर्यटनासाठी खास आवाहन
‘तुम्ही फक्त खंडाळ्याचं प्रमोशन केलं, आता महाराष्ट्रातील इतर स्थळांचं प्रमोशन कधी करणार?’; मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने सोहळ्यात हास्यकल्लोळ

मुंबई : महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री राणी मुखर्जीने मराठमोळ्या अंदाजात उपस्थितांची मने जिंकली. पुरस्कार स्वीकारताना तिने आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. तिच्या या अंदाजाचे कौतुक होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणी मुखर्जीबाबत केलेली मिश्किल टिप्पणी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
मुंबईत पार पडलेल्या ६२व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते मनोरंजन क्षेत्रातील विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. अभिनेत्री राणी मुखर्जीला यावेळी स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने गौरवण्यात आले.
पुरस्कार प्रदान केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राणी मुखर्जीच्या कारकिर्दीचा उल्लेख करत तिच्या अभिनयाचे कौतुक केले. राणीने गेल्या तीन दशकांत हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली असून, नंतर तिने स्त्रीकेंद्री भूमिका निवडण्यावर भर दिला, असे फडणवीस म्हणाले. ‘मर्दानी’मधील तिच्या भूमिकेचाही त्यांनी उल्लेख केला.
यानंतर मुख्यमंत्र्यांनी राणी मुखर्जीला ‘आती क्या खंडाला’ या लोकप्रिय गाण्याची आठवण करून देत मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले की, राणीला पुरस्कार मिळणार असल्याचे समजल्यानंतर महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने त्यांच्याकडे एक तक्रार केली. “त्यांनी फक्त खंडाळ्याचं प्रमोशन केलं आहे. महाराष्ट्रात इतकी वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळे आहेत. आता त्या स्थळांचं प्रमोशन कधी करणार?” अशी तक्रार राणीपर्यंत पोहोचवण्यास पर्यटन विभागाने सांगितल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे पुरस्कार सोहळ्यात उपस्थितांमध्ये हशा पिकला. राणी मुखर्जी महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांचेही प्रमोशन करेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
‘महाराष्ट्र माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी’
दरम्यान, पुरस्कार स्वीकारताना राणी मुखर्जीने मराठीतून आपल्या भावना व्यक्त केल्या. “माझ्यासाठी महाराष्ट्र एक राज्य नाही; महाराष्ट्र माझी जन्मभूमी आहे, माझी कर्मभूमी आहे आणि माझ्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे,” असे तिने सांगितले.
मुंबईत जन्मल्याचा आणि याच शहरात आपले यश-अपयश पाहिल्याचा उल्लेख करत राणीने महाराष्ट्राशी असलेल्या भावनिक नात्याबद्दल सांगितले. राज कपूर यांच्या नावाने मिळणारा पुरस्कार आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचेही तिने नमूद केले.
सिनेसृष्टीत लहान वयात प्रवेश केल्यानंतर भूमिका निवडताना त्या भूमिकेचा समाजावर होणारा परिणाम आपण विचारात घेतल्याचे राणीने सांगितले. सिनेमा हा आपल्यासाठी केवळ व्यवसाय नसून एक भावना आहे, अशी भावना तिने व्यक्त केली.




