ISROची ऐतिहासिक भरारी! GSLV-F17च्या माध्यमातून EOS-05 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
भारताच्या भूभागाचे जवळपास प्रत्यक्ष वेळेत निरीक्षण शक्य; सीमा आणि संवेदनशील भागांवर लक्ष ठेवण्यासाठी उपग्रह ठरणार महत्त्वाचा

दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)ने अंतराळ क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची कामगिरी केली आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या प्रक्षेपण तळावरून GSLV-F17च्या माध्यमातून अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-05चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
प्रक्षेपणानंतर GSLV रॉकेटने EOS-05 उपग्रहाला अत्यंत अचूकतेने उप-भूस्थिर संक्रमण कक्षेत स्थापित केले. भारताच्या भूभागाचे जवळपास प्रत्यक्ष वेळेत निरीक्षण करण्याची क्षमता या उपग्रहामुळे वाढणार आहे. सुमारे ३६ हजार किलोमीटर उंचीवरून भारताच्या भूभागाचे सातत्याने निरीक्षण करण्यासाठी EOS-05ची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे देशाच्या सीमा तसेच संवेदनशील भागांवर लक्ष ठेवण्यासाठी हा उपग्रह महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
इस्रोचे प्रमुख डॉ. व्ही. नारायणन यांनी मोहिमेच्या यशाची घोषणा करताना आनंद व्यक्त केला. EOS-05ला नियोजित कक्षेत यशस्वीपणे स्थापित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – गणेशोत्सवात DJच्या दणदणाटाला आळा; राज्यातील अनेक शहरांत निर्बंध, कुठे बंदी तर कुठे आवाजाची मर्यादा
GSLV मोहिमेचे मिशन संचालक थॉमस कुरियन यांनी सांगितले की, GTO किंवा Sub-GTO कक्षेत GSLVच्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात आलेला EOS-05 हा आतापर्यंतचा सर्वांत वजनदार उपग्रह आहे. या मोहिमेच्या यशामागे अनेक महिने आणि वर्षांच्या अथक परिश्रमांचा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.
GSLV-F17ची वैशिष्ट्ये
GSLV-F17 हे प्रक्षेपण यान सुमारे ५१.७ मीटर उंच असून त्याचे प्रक्षेपणावेळचे वजन ४२०.५ टन आहे. त्यामुळे भारताच्या कार्यरत प्रक्षेपण यानांपैकी हे एक मोठे यान ठरते.
EOS-05मुळे भारताच्या भूभागाचे सातत्याने विहंगम निरीक्षण करण्याची क्षमता वाढणार आहे. विशेषतः सीमा आणि संवेदनशील भागांवर लक्ष ठेवण्यास या उपग्रहाचा उपयोग होऊ शकतो. पृथ्वी निरीक्षणाच्या क्षेत्रात भारताची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनीही GSLV-F17 मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणाचे कौतुक केले. भारताची अंतराळ क्षेत्रातील क्षमता सातत्याने वाढत असून, जागतिक अंतराळ क्षेत्रातील देशाचे स्थान अधिक मजबूत होत असल्याचे त्यांनी म्हटले.





