TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणेशोत्सवात DJच्या दणदणाटाला आळा; राज्यातील अनेक शहरांत निर्बंध, कुठे बंदी तर कुठे आवाजाची मर्यादा

नागपुरात 1 नोव्हेंबरपर्यंत डॉल्बीवर बंदी; सोलापुरात DJ-लेझरला मनाई, नवी मुंबईतही DJला परवानगी नाही

मुंबई : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर DJ, डॉल्बी साऊंड सिस्टीम आणि लेझर लाईटच्या वापरावरून प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. ध्वनिप्रदूषण आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता राज्यातील विविध शहरांमध्ये DJ आणि डॉल्बीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. काही ठिकाणी पूर्ण बंदी घालण्यात आली असून, काही शहरांमध्ये न्यायालय आणि शासनाने निश्चित केलेल्या ध्वनी मर्यादेतच साऊंड सिस्टीम वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.

नागपुरात 1 नोव्हेंबरपर्यंत डॉल्बीवर बंदी

नागपूर शहरात गणेश मिरवणुकीत वापरल्या जाणाऱ्या DJ आणि डॉल्बी साऊंड सिस्टीमवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी याबाबत अधिसूचना जारी केली असून, 3 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून 1 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे.

सोलापुरात DJ आणि लेझरवर निर्बंध

सोलापूर जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या काळात डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईटच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. 13 ते 26 सप्टेंबरदरम्यान हे निर्बंध लागू राहणार आहेत. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास साऊंड सिस्टीम जप्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नवी मुंबईतही DJला परवानगी नाही

नवी मुंबई आणि पनवेलमध्ये गणेशोत्सव काळात DJला परवानगी दिली जाणार नाही. DJच्या मोठ्या आवाजामुळे होणारे ध्वनिप्रदूषण तसेच लेझर लाईटमुळे डोळ्यांना होणारी संभाव्य इजा लक्षात घेऊन गणेश मंडळांनी DJचा वापर टाळावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा –  छत्रपती संभाजीनगर हादरलं! एशियन हॉस्पिटलच्या NICUला मध्यरात्री भीषण आग; ९ नवजात बाळांसह ५८ रुग्ण सुखरूप

सांगलीत नियम मोडल्यास DJचे साहित्य जप्त

सांगलीत DJ आणि ध्वनिवर्धकांचा नियमबाह्य वापर सहन केला जाणार नसल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. ध्वनी मर्यादेचे उल्लंघन झाल्यास गुन्हा दाखल करण्यासोबतच DJचे साहित्य जप्त केले जाणार आहे. पोलिसांकडील ध्वनिमापक यंत्राद्वारे आवाजाची तपासणी केली जाणार आहे.

सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी गणेश मंडळांना DJऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. यंदा ‘एक मंडळ, एक अंमलदार’ ही संकल्पनाही राबवण्यात येणार आहे.

कोल्हापुरात दोन बेस आणि दोन टॉपला परवानगी

कोल्हापुरात गणपती आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी दोन बेस आणि दोन टॉप लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ध्वनी मर्यादा ओलांडल्यास संबंधित गणेश मंडळावर कारवाई केली जाणार आहे.

धुळ्यात DJ व्यावसायिक आक्रमक

धुळे जिल्ह्यात DJ आणि साऊंड सिस्टीमवर बंदीच्या निर्णयामुळे व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे. सुमारे 400 ते 500 DJ व्यावसायिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. DJ व्यावसायिकांनी पालकमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन नियमांच्या चौकटीत DJचा आवाज ठेवण्याची तयारी दर्शवली आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले आहे.

कोकणात अद्याप निर्णय नाही

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत गणेशोत्सवातील DJ बंदीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. जिल्हा प्रशासनाकडून निर्णय झाल्यानंतर माहिती देण्यात येणार आहे.

पालघरमध्ये DJ बंद नाही, मात्र आवाजावर मर्यादा

पालघर जिल्ह्यात DJवर संपूर्ण बंदी घालण्यात आलेली नाही. मात्र, शासन आणि न्यायालयाने निश्चित केलेल्या ध्वनी मर्यादेचे पालन करणे गणेश मंडळांसाठी बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी ध्वनिप्रदूषण होणार नाही आणि नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

दरम्यान, मुंबईतही गणेशोत्सव काळात न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करून DJ वाजवल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात

DJचा दणदणाट कमी करण्यासाठी प्रशासनाने शहरनिहाय कडक नियम लागू करण्यास सुरुवात केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group