TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘RSS महिलेला सरसंघचालक करणार का?’; पृथ्वीराज चव्हाण

महिला आरक्षणावरून भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप; पेपरफुटी, रस्त्यांची दुरवस्था आणि कुंभमेळ्याच्या कामांवरही चव्हाणांची टीका

नाशिक : महिलांना राजकारणात संधी देण्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला थेट सवाल केला आहे. ‘महिलांना संधी देण्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात असतील, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एखाद्या महिलेला सरसंघचालक करणार का?’ असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला.

राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांना राजकीय संधी का दिली नाही, असा सवाल भाजपकडून करण्यात येत आहे. त्याला प्रत्युत्तर देताना चव्हाण यांनी हा सवाल केला. महिलांना राजकारणात संधी देण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘काँग्रेस महिला आरक्षणाला विरोध करत आहे, असे कोण म्हणाले? २०२३ मध्ये महिला आरक्षणाचे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत आले, त्यावेळी काँग्रेसने त्याला पाठिंबा दिला होता. महिला आरक्षणाचे जनक काँग्रेसच आहे,’ असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

राहुल गांधींसोबत राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा

नाशिकमध्ये काँग्रेसचे दहा दिवसांचे शिबिर सुरू असून, त्याच्या समारोपासाठी राहुल गांधी उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांसोबत बैठक घेतली. कुंभमेळा, शक्तिपीठ मार्ग, शेतकऱ्यांच्या समस्या यांसह राज्यातील विविध प्रश्नांची माहिती राहुल गांधी यांना देण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा –  काळभोर नगरातील ५३ महिला बनल्या उद्योजकतेच्या दिशेने सक्षम!

पेपरफुटीवरून सरकारवर निशाणा

राज्यातील पेपरफुटीच्या घटनांवरही चव्हाण यांनी सरकारवर टीका केली. वारंवार पेपरफुटी होत असून त्यात सत्ताधारी पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर आरोप होत असल्याचे त्यांनी म्हटले. पेपर मोठ्या रकमेला विकला जात असल्याचा आरोप करत या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

रस्त्यांच्या दुरवस्थेवरही टीका

नाशिकमध्ये येताना राहुल गांधी यांना खड्ड्यांमधून प्रवास करावा लागल्याचा मुद्दा उपस्थित करत चव्हाण यांनी राज्यातील रस्त्यांच्या स्थितीवर टीका केली. ‘सगळेच रस्ते खड्डेमय झाले आहेत,’ असे ते म्हणाले.

कुंभमेळ्याच्या प्रकल्पाचा अहवाल अद्याप आलेला नसल्याचा दावा करत त्यांनी कामांमध्ये मोठ्या प्रमाणात कमिशनखोरी होत असल्याचा आरोप केला. शक्तिपीठ मार्गाच्या कामातही कमिशन घेतल्याचा आरोप त्यांनी केला. या आरोपांवर संबंधितांकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या महिला आरक्षणासंदर्भातील भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत भाजपकडून राज्यभर आंदोलन सुरू आहे. प्रियंका गांधी यांना संधी देण्याबाबत भाजपकडून राहुल गांधी यांच्यावर टीका केली जात आहे. त्यामुळे महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button