निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणातून पारदर्शकता, विश्वासार्हता अधोरेखित; चंद्राबाबू नायडूंची भूमिका
SIRवरील निर्णयांबाबत आयोगाचे स्पष्टीकरण; घटनात्मक संस्थांचा सन्मान राखण्याचे नायडूंचे आवाहन

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगाच्या कामकाजावरून गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. विशेषतः मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची (SIR) प्रक्रिया आणि अन्य निर्णयांबाबत आयोगातील अंतर्गत मतभेदांच्या वृत्तामुळे राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की आयोगाचे अंतिम निर्णय एकमताने घेण्यात आले आहेत.
आयोगाच्या स्पष्टीकरणानुसार, बहुसदस्यीय घटनात्मक संस्थेमध्ये चर्चेदरम्यान वेगवेगळी मते, निरीक्षणे किंवा सूचना मांडल्या जाणे ही प्रक्रियेचा भाग आहे. मात्र अंतिम निर्णय घेताना सर्व तीन निवडणूक आयुक्तांची मंजुरी असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. SIRसह आयोगाने घेतलेल्या निर्णयांना तिन्ही आयुक्तांची मान्यता असल्याचेही सांगण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणाचे स्वागत केले. आयोगाने दिलेल्या एकमताच्या स्पष्टीकरणातून घटनात्मक संस्थांची विश्वासार्हता आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता अधोरेखित होत असल्याचे त्यांनी म्हटले.
हेही वाचा – ‘अन्न सुरक्षेचे नियम आहेत, मात्र पालन होत नाही’; तुकाराम मुंढेंचे भेसळखोरांवर स्पष्ट भाष्य
‘SIRचे निर्णय संस्थात्मक प्रक्रियेनुसार’
SIRसंदर्भातील निर्णय सामूहिक पद्धतीने आणि संस्थात्मक नियमांचे पालन करून घेतले जात असल्याचे नायडू यांनी नमूद केले. आयोगाच्या स्पष्टीकरणामुळे निर्माण झालेल्या विविध गैरसमजांना पूर्णविराम मिळेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, आयोगातील दोन निवडणूक आयुक्तांनी काही निर्णयांबाबत आक्षेप किंवा निरीक्षणे नोंदवल्याचे माध्यमांच्या वृत्तांत नमूद करण्यात आले होते. या मुद्द्यांमध्ये मतदारांची नावे वगळणे, Form-6 आणि मतदारांच्या डेटाशी संबंधित प्रक्रिया यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. मात्र निवडणूक आयोगाने या अंतर्गत मतांना अंतिम निर्णयांवरील मतभेद मानण्यास नकार दिला आहे.
‘लोकशाही संस्थांवरील विश्वास कायम ठेवणे आवश्यक’
लोकशाही व्यवस्था आणि निवडणूक प्रक्रियेबाबत देशात किंवा परदेशात अविश्वास निर्माण होईल, अशा पद्धतीने मुद्द्यांचा वापर होऊ नये, असे नायडू यांनी म्हटले. निवडणुकीचा निकाल हा जनतेच्या कौलाचे प्रतिबिंब असतो, असे सांगत त्यांनी विजय आणि पराभव दोन्ही संयमाने स्वीकारण्याचे आवाहन केले.
घटनात्मक संस्थांचा आदर आणि त्यांच्यावरील जनतेचा विश्वास कायम ठेवणे ही सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची सामूहिक जबाबदारी असल्याचेही नायडू यांनी नमूद केले.





